बंगळूरु : गेल्या चारही सामन्यांत पराभव पत्करावा लागूनही उपांत्य फेरी गाठण्यासाठी भक्कम स्थितीत असलेल्या न्यूझीलंडसमोर एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज, गुरुवारी श्रीलंकेचे आव्हान असेल. बंगळूरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
न्यूझीलंडच्या संघाने यंदाच्या विश्वचषकात दमदार सुरुवात करताना सलग चार विजय नोंदवले होते. त्यामुळे न्यूझीलंडचा उपांत्य फेरीतील प्रवेश ही केवळ औपचारिकता वाटत होती. मात्र, त्यानंतर खेळाडूंच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आणि काही प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापती, यामुळे न्यूझीलंड संघाची कामगिरी खालावली. त्यांना सलग चार सामन्यांत पराभव पत्करावा लागला. यानंतरही न्यूझीलंडला उपांत्य फेरीची सर्वोत्तम संधी आहे. न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर असून त्यांची निव्वळ धावगती +०.३९८ अशी आहे.
हेही वाचा >>> AUS vs AFG: अफगाणिस्तानच्या पराभवावर प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटचे सूचक विधान; म्हणाला, “आम्ही त्याला यात मदत…”
न्यूझीलंडच्या फलंदाजांनी विशेषत: रचिन रवींद्र आणि डॅरेल मिचेल यांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, न्यूझीलंडचे गोलंदाज चमक दाखवण्यात अपयशी ठरले आहेत. गेल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध याच मैदानावर न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४०० धावांची मजल मारली होती; परंतु पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानला रोखण्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अपयश आले. त्यातच पाकिस्तानला पावसाचीही मदत झाली. त्यामुळे डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार पाकिस्तानने विजय मिळवला आणि न्यूझीलंडला आणखी एक हार पत्करावी लागली.
आज होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडवरच दडपण असेल. श्रीलंकेच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे श्रीलंकेचे खेळाडू दडपणाविना आपला नैसर्गिक खेळ करू शकतील. तसेच सामन्यादरम्यान पावसाचाही अंदाज असल्याने न्यूझीलंडची कसोटी लागणार आहे.
’ वेळ : दुपारी २ वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी, हॉटस्टार अॅप
* कर्णधार केन विल्यम्सनच्या पुनरागमनामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजीला बळकटी मिळाली आहे. कर्णधार म्हणूनही त्याची भूमिका निर्णायक ठरेल. न्यूझीलंडच्या फलंदाजीची भिस्त विल्यम्सन, रचिन रवींद्र, डेव्हॉन कॉन्वे आणि डॅरेल मिचेलवर असेल. न्यूझीलंडसमोर गोलंदाजीचा पेच आहे. गेल्या सामन्यात न्यूझीलंडला ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी या केवळ दोन वेगवान गोलंदाजांसह खेळावे लागले होते.
* श्रीलंकेचा संघ चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पात्रतेचे ध्येय बाळगून आहे. यासाठी त्यांना अव्वल सात संघांमध्ये स्थान मिळवावे लागेल. श्रीलंकेचा संघ सध्या चार गुणांसह नवव्या स्थानावर आहे.