ICC Releases ODI World Cup 2023 Promo: भारतात खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी तीन महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक राहिला. त्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तयारी सुरू केली आहे. आयसीसीकडून या स्पर्धेचे प्रमोशनही जोरदार केले जात आहे. या एपिसोडमध्ये नुकताच एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान चमकणाऱ्या ट्रॉफीसोबत दिसत आहे. बॉलीवूडच्या किंगने यात आवाज दिला आहे.
आयसीसीने जारी केलेल्या प्रोमोच्या सुरुवातीला जगभरातील विविध क्रिकेट चाहत्यांना दाखवण्यात आले आहे. यानंतर मागून शाहरुख खानचा आवाज येतो, जो वन डे (ODI) चे महत्त्व सांगतो. इतिहास घडवण्यासाठी, शौर्य दाखवण्यासाठी, काहीतरी मोठे करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
व्हिडिओमध्ये शाहरुख खान पुढे सांगतो की, जेव्हा स्पर्धा होईल तेव्हा सर्व खेळाडू आपली ताकद दाखवतील, लोक आनंदाने उड्या मारतील, सर्वत्र गाणी वाजवली जातील आणि त्या दिवशी इतिहास रचला जाईल. व्हिडीओच्या शेवटी शुबमन गिल हसताना दाखवण्यात आला आहे. यानंतर किंग खानही चमकणाऱ्या ट्रॉफीसोबत दिसत आहे.
तत्पुर्वी बुधवारी रात्री (१९ जुलै) शाहरुख खानचा आयसीसी वर्ल्ड कप ट्रॉफीसोबतचा फोटो आयसीसीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला. या फोटोमध्ये शाहरुख खान विश्वचषक ट्रॉफीकडे अतिशय क्यूट अंदाजात बघताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे की, “तो जवळपास आला आहे…” यावेळी टीम इंडियाला १९८३ आणि २०११ नंतर तिसरा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे.
स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून होणार सुरुवात –
५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२३ दरम्यान एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वी, आयसीसी आणि बीसीसीआयने विश्वचषक २०२३ च्या ट्रॉफीचे अनावरण केले होते. विशेष बाब म्हणजे या ट्रॉफीचे अनावरण अंतराळात करण्यात आले. ट्रॉफी जमिनीपासून एक लाख २० हजार फूट उंचीवर अंतराळात पाठवण्यात आली आणि तेथे तिचे अनावरण करण्यात आले.
या शहरात होणार विश्वचषक स्पर्धेचे सामने –
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यासाठी अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, धर्मशाळा, हैदराबाद, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पुणे शहरांचा समावेश आहे. त्याचबरोबक हैदराबादसह गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरममध्ये सराव सामने खेळवले जातील. १३ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तानचा विश्वचषकातील शानदार सामना पाहायला मिळणार आहे.