टी-२० विश्वचषक २०२४ साठी सर्वच देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. २ जूनपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत विजेतेपदासाठी २० संघ एकमेकांविरूद्ध भिडणार आहेत. यावेळचा विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या यजमानपदाखाली खेळवण्यात येणार आहे. पण आता स्पर्धा सुरू होण्यापूर्वी वेस्ट इंडिजच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. वेस्ट इंडिजच्या अनुभवी खेळाडून वर्ल्डकपमधून माघार घेतली आहे.

वेस्ट इंडिजचा महत्त्वाचा खेळाडू जेसन होल्डर दुखापतीमुळे २०२४ च्या T20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ओबेड मॅकॉयचा वेस्ट इंडिज संघात समावेश करण्यात आला आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली.

क्रिकेट वेस्ट इंडीज (CWI) ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज आगामी टी-२० विश्वचषक २०२४ साठी वेस्ट इंडिज संघाने महत्त्वपूर्ण घोषणा करत आहे. जेसन होल्डर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला असून त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज ओबेड मॅकॉयचा संघात समावेश करण्यात आला आहे. CWI ला विश्वास आहे की मॅकॉयच्या समावेशामुळे संघ मजबूत होईल. २०२४ च्या काउंटी चॅम्पियनशिप दरम्यान होल्डरला दुखापत झाली होती. तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.

वेस्ट इंडिडचे राखीव खेळाडू जाहीर
१५ सदस्यीय संघाव्यतिरिक्त, आज वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने ५ राखीव खेळाडूंची घोषणा केली आहे. गरज पडल्यास या खेळाडूंचा मुख्य संघात समावेश केला जाईल. या खेळाडूंमध्ये काइल मेयर्स, मॅथ्यू फोर्ड, फॅबियन ऍलन, हेडन वॉल्श आणि आंद्रे फ्लेचर यांचा समावेश आहे.

T20 World Cup 2024 साठी वेस्ट इंडिजचा संघ

रोव्हमन पॉवेल (कर्णधार), अल्झारी जोसेफ (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, शाई होप, अकील होसेन, शमर जोसेफ, ब्रँडन किंग, ओबेड मॅकॉय, गुडाकेश मोती, निकोलस पूरन, आंद्रे रसेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड.