ICC Womens World Cup 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारतीय संघाला इंग्लंडकडून हातचा सामना गमवावा लागला आहे. भारतीय संघाला या सामन्यात विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण शेवटच्या षटकांमध्ये हा सामना भारतीय संघाच्या हातून निसटला. या सामन्यात भारतीय संघाची उपरकर्णधार स्मृती मानधनाने दमदार अर्धशतकी खेळी कलेी.तरीदेखील या सामन्यानंतर तिने पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी २८९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरूवात मिळाली होती. पण हवा तसा शेवट करता आला नाही. सुरूवातीला भारतीय संघाची सामन्यावर मजबूत पकड होती. पण विकेट्स गमावल्यामुळे भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला.

या सामन्यात धावांचा पाठलाग करताना स्मृती मानधनाने ८८ धावांची सलामी दिली. तिने एक बाजू धरून ठेवली होती. पण ती नेमकी त्याचवेळी बाद झाली,ज्यावेळी भारतीय संघाला तिची जास्त गरज होती. ती बाद झाल्यानंतर विकेट्सची रांग लागली आणि भारतीय संघाचा पराभव झाला. अर्धशतकी खेळी करूनही तिने या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. सामन्यानंतर बोलताना ती म्हणाली, “आम्हाला फक्त ६ च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. कदाचित आम्ही हा खेळ आणखी पुढे घेऊन जायला हवा होता. मी या पराभवाची जबाबदारी स्वतःवर घेते. कारण विकेट्स पडण्याची सुरूवात माझ्यापासूनच झाली.”

तसेच ती पुढे म्हणाली, “मला वाटलं मी त्यांच्या गोलंदाजीचा सांमना करू शकते. मी कव्हर्सच्या वरून मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात होते. पण माझ्या फटक्याचा टायमिंग चुकला. कदाचित मी त्यावेळी तो फटका मारायला नको होता. मी आणखी थोडा संयम ठेवायला हवा होता. कारण या संपूर्ण डावात मी स्वत:ला मोठा फटका खेळणं टाळण्याचा आणि संयम ठेवण्याचा सल्ला देत होते.” भारतीय संघाला जिंकण्यासाठी २८९ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक ८८ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने ७० धावांची खेळी केली आणि दिप्ती शर्माने ५० धावांची खेळी केली. भारतीय संघाला हा सामना ४ धावांनी गमवावा लागला आहे.