India Clean Sweep West Indies test series: भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ विकेटसने विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० च्या फरकाने निर्भेळ मालिका विजय नोंदवला आहे. याचबरोबर कसोटी कर्णधार म्हणून शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाचा हा पहिला मालिका विजय ठरला आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. केएल राहुलने चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सलामीवीर केएल राहुल ५८ धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देत माघारी परतला.

भारतीय संघाने २००२ पासून वेस्ट इंडिजविरूद्ध एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. २००२ पासून २०२५ पर्यंत भारताने लागोपाठ १० कसोटी मालिका आपल्या नावे केल्या आहेत. जो एक मोठा विक्रम आहे आणि हा रेकॉर्ड कायम ठेवत भारताने ऐतिहासिक मालिका विजय नोंदवला.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आज १४ ऑक्टोबर २०२५ला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे आणि त्याच दिवशी, भारताने दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजचा पराभव करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. हा विजय गंभीरसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून महत्त्वाचा ठरणार आहे.

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ५ विकेट्स गमावत ५१८ धावांचा डोंगर उभारला. पहिल्या डावात भारताने ५१८ धावा करत डाव घोषित केला. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने २५८ चेंडूत २२ चौकारांसह १७५ धावांची खेळी केली. यानंतर साई सुदर्शनने ८७ धावा केल्या. तर कर्णधार शुबमन गिलने १९६ चेंडूत १६ चौकार आणि २ षटकारांसह १२९ धावा केल्या. तर नितीश रेड्डीने ४३ धावा व ध्रुव जुरेलने ४४ धावांची खेळी केली.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात २४८ धावा करत सर्वबाद झाला आणि वेस्ट इंडिजला फॉलोऑन देण्यात आला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात ३९० धावा करत भारतासमोर विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजकडून जॉन कॅम्पबेल आणि शे होप यांनी शतकं झळकावली.

तर गोलंदाजीत भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादवने उत्कृष्ट गोलंदाजी केली. कुलदीपने पहिल्या डावात ५ विकेट्स घेत दुसऱ्या कसोटीत एकूण ८ विकेट्स घेतल्या. जडेजा आणि बुमराहने मिळून चार, तर सिराजने तीन विकेट घेतल्या. भारतासमोर आता विजयासाठी १२१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे संघाने ७ विकेट्स शिल्लक ठेवत गाठले. केएल राहुलने १०८ चेंडूत ६ चौकार आणि २ विकेट्स घेत ५८ धावा करत नाबाद राहिला. तर साई सुदर्शनने ३९ धावांची खेळी केली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत क्लीन स्वीपसह, भारताने शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली पहिली कसोटी मालिका जिंकली आहे. ३७८ दिवसांत भारताचा हा पहिलाच कसोटी मालिका विजय आहे. भारताने अखेरचा कसोटी मालिका विजय गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध मिळवला होता.