India vs Australia 2nd ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरमध्ये होणार आहे. हा सामना जिंकून संघ भारत मालिका जिंकू इच्छित आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. या सामन्याला दुपारी दीड वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यात मनगटाच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्सने पुनरागमन केले होते. मात्र, या सामन्यात त्यानी विश्रांती घेतली आहे. भारताचा बुमराह या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळाली आहे.
इंदूरमध्ये टीम इंडिया अजिंक्य –
होळकर क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व आहे. टीम इंडियाच्या येथील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग सोपा नसेल. भारताने इंदूरमध्ये आतापर्यंत ६ वनडे सामने खेळले आहेत. टीम इंडियाने हे सर्व सामने जिंकले आहेत. या मैदानावर भारतीय संघाने जगातील निवडक संघांना पराभूत केले आहे. या काळात भारताने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसत आहे.




६ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा झाला होता पराभव –
इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सामना खेळण्याची ही दुसरी वेळ असेल. याआधी २०१७ मध्ये याच स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने कांगारूंचा ५ विकेट्स राखून पराभव केला होता. तत्पूर्वी सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळताना ६ गडी गमावत २९३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंचने १२४ आणि स्टीव्ह स्मिथने ६३ धावा केल्या.
भारताकडून जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने २-२ विकेट घेतल्या. विजयासाठीचे २९४ धावांचे लक्ष्य भारताने ५ गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने सर्वाधिक ७८, रोहित शर्माने ७१ आणि अजिंक्य रहाणेने ७० धावा केल्या. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीराचा किताब देण्यात आला होता.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन –
भारत: शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन.