Rohit Sharma Record, IND vs AUS 2nd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा वनडे सामना अॅडलेडच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दमदार सुरूवात करून दिली. रोहित पहिल्या सामन्यात अवघ्या ८ धावांवर माघारी परतला होता. पण दुसऱ्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेत वनडे कारकिर्दीतील ५९ वे अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान असा पराक्रम केला आहे, जो याआधी आशियातील कुठल्याही फलंदाजाला करता आला नव्हता.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी मैदानावर आली. या सामन्यातही गिल स्वस्तात माघारी परतला. पण रोहितने एक बाजू धरून ठेवली होती. त्याने सुरूवातीचे काही चेंडू खेळून काढले. त्यानंतर त्याला जेव्हा जेव्हा मोठे फटके खेळण्याची संधी मिळाली, तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. यादरम्यान त्याने पुल शॉट मारून २ खणखणीत षटकार मारले. या षटकारांसह तो SENA (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० षटकार ठोकणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. याआधी आशियातील कुठल्याही फलंदाजाला असा पराक्रम करता आलेला नाही.
SENA देशांमध्ये वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे आशियाई फलंदाज
रोहित शर्मा- १५० षटकार, भारत
सनाथ जयसूर्या- ११३ षटकार, श्रीलंका
शाहिद आफ्रिदी- १०३ षटकार, पाकिस्तान
एमएस धोनी- ८३ षटकार, भारत
विराट कोहली- ८३ षटकार, भारत
यासह रोहित शर्माच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. रोहितने पहिला चौकार मारताच ऑस्ट्रेलियात वनडे क्रिकेट खेळताना १००० धावांचा पल्ला गाठला आहे. रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे क्रिकेट खेळताना १००० धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेट खेळताना सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
रोहित शर्मा – १०००* धावा
विराट कोहली – ८०२ धावा
सचिन तेंडुलकर – ७४० धावा
एमएस धोनी – ६८४ धावा
शिखर धवन -५१७ धावा