India vs Australia 2nd ODI, Rohit Sharma Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना ॲडलेडच्या मैदानावर सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात रोहित शर्मा अवघ्या ८ धावा करत माघारी परतला होता. पण दुसऱ्या वनडेत दमदार पुनरागमन करून त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा ७ महिन्यांनंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. पहिल्या सामन्यात तो संघर्ष करताना दिसून आला होता. त्यामुळे त्याचा पहिला डाव अवघ्या ८ धावांवर आटोपला. पण दुसऱ्या डावात फलंदाजी करतांना त्याने सुरुवातीला वेळ घेतला आणि खेळपट्टीवर टिकून फलंदाजी केली. पण जेव्हा जेव्हा संधी केली तेव्हा, त्याने मोठे फटके मारले. दरम्यान या डावात ६ धावा करताच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत.

अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माने अनेक मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. आता या यादीत आणखी एका विक्रमाचा समावेश झाला आहे. रोहित शर्माने ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेट खेळताना १००० धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराटने ८०२ धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरच्या नावे ७४० धावा करण्याची नोंद आहे.

ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्रिकेट खेळताना सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज

रोहित शर्मा – १०००* धावा
विराट कोहली – ८०२ धावा
सचिन तेंडुलकर – ७४० धावा
एमएस धोनी – ६८४ धावा
शिखर धवन -५१७ धावा