Rohit Sharma Shubman Gill Popcorn Party Abhishek Nayar Reaction: भारताला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या वनडे सामन्यात ७ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना २६ षटकांचा खेळवण्यात आला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि जो अगदी योग्य ठरला. भारताची टॉप फलंदाजी फळी अपयशी ठरली. पावसामुळे सामना थांबल्यानंतर रोहित शर्मा आणि नवा कर्णधार शुबमन गिल पॉपकॉर्न खाताना दिसले, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
खराब हवामान आणि चांगल्या खेळपट्टीचा फायदा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झाला, ज्यामुळे भारतीय संघाचे टॉप-४ फलंदाज अपयशी ठरले. रोहित शर्माला त्याचा ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना संस्मरणीय बनवता आला नाही. तर विराट कोहली खाते न उघडताच बाद झाला. यानंतर गिलनेही आपली विकेट गमावली. यासह भारताची स्थिती ३ बाद २५ धावा अशी झाली होती.
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माला जोश हेझलवूडने झेलबाद केलं. रोहित १४ चेंडूत ८ धावा करत बाद झाला. सलामीवीर आणि कर्णधार शुबमन गिलला नॅथन एलिसने १० धावांवर बाद केलं. त्यानंतर, विराट कोहलीही बाद झाला. पावसामुळे सामना थांबवण्यात आला. पावसाने बराच वेळ उपस्थिती लावल्याने सर्व खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये होते. यादरम्यान शुबमन गिल बराच वेळ रोहित शर्माबरोबर चर्चा करताना दिसला.
रोहित शर्मा-शुबमन गिलची पावसाच्या ब्रेकमध्ये पॉपकॉर्न पार्टी
रोहित-गिल एकमेकांशी चर्चा करत असताना ड्रेसिंग रूममध्ये पॉपकॉर्न खाताना दिसले. शुबमन गिल पॉपकॉर्नचा मोठा टब घेऊन आला होता. गिलने पॉपकॉर्न खाताना रोहितबरोबर पॉपकॉर्न शेअर करण्यासाठी टब त्याच्यापुढे केला. रोहितनेही पॉपकॉर्न घेतले. रोहित पॉपकॉर्न घेत असताना समालोचन करत असलेल्या अभिषेक नायरने व्हीडिओ पाहताच “अरे ए त्याला पॉपकॉर्न देऊ नकोस…” असं म्हटलं.
रोहित शर्माने अभिषेक शर्माच्या मार्गदर्शनासह आणि मदतीने ११ किलो वजन घटवलं आणि कमालीचा फिटनेस मिळवला. सामन्यापूर्वी अभिषेक नायरने रोहित शर्माच्या फिटनेस आणि वजन घटवण्याबाबत माहिती दिली होती.
अभिषेक नायर रोहितच्या फिटनेसबाबत सांगताना म्हणाला, “थोडक्यात सांगू तर, दररोज ३ तास तो ट्रेनिंग करायचा. आम्ही कार्डीओवर जास्त भर दिला नाही. सुरूवातीच्या ५ आठवड्यात त्याची मानसिकता एका बॉडीबिल्डरसारखी होती. जिथे त्याला फक्त वजन कमी करायचे होते. त्याने जास्त रेपिटेशन्स करून एका बॉडीबिल्डरप्रमाणे प्रशिक्षण घेतलं.”