Abhishek Sharma Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना गुरुवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दमदार विजयाची नोंद केली. यासह मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याला चांगली सुरूवात मिळाली होती. पण या सुरूवातीचं रूपांतर तो मोठ्या खेळीत करू शकला नाही. तो २१ धावा करून अॅडम झाम्पाच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला. यादरम्यान त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
या खेळीदरम्यान त्याने १३३.३३ च्या स्ट्राईक रेटने धावा करताना १ षटकार मारला. यासह त्याने खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज एविन लुईसचा विक्रम मोडून काढला आहे. या एकमेव षटकारासह तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून सुरूवातीच्या २५ डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक शर्माने नेहमीच आक्रमक सुरूवात करून दिली आहे. या डावात फलंदाजी करताना देखील चौकार मारून डावाची सुरूवात केली.यासह एक खणखणीत षटकार देखील मारला. अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना २५ डावात ६४ षटकार मारले आहेत. तर वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज एविन लुईसच्या नावे २५ डावात ६० षटकार मारण्याची नोंद आहे. आता अभिषेक शर्मा एविन लुईसला या विक्रमात मागे टाकून पुढे निघाला आहे.
हे आहेत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुरूवातीच्या २५ डावात सर्वाधिक षटकार मारणारे सलामीवीर फलंदाज
अभिषेक शर्मा- ६४ षटकार
एविन लुईस- ६० षटकार
कॉलिन मुनरो- ५८ षटकार
हजरतुल्लाह जजई- ५४ षटकार
ख्रिस गेल -५१ षटकार
केएल राहुल – ४७ षटकार
ट्रॅव्हिस हेड- ४३ षटकार
अभिषेक शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर १ क्रमांकाचा फलंदाज आहे. अभिषेकला आतापर्यंत २७ वेळा फलंदाजीला येण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान तो २५ वेळा डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आला आहे. तर २ वेळा त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला केवळ १ षटकार मारता आला होता. पण सलामीला फलंदाजी करताना त्याने ६३ षटकार मारले आहेत.
