Shubman Gill On Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये १९ ऑक्टोबरपासून ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये रंगणार आहे. या सामन्याआधी भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचं ट्रॉफीसोबत फोटोशूट झालं. युवा फलंदाज शुबमन गिल पहिल्यांदाच भारतीय वनडे संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने रोहित शर्मासोबतच्या संबंधांवर स्पष्टीकरण दिले आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर दुबईत झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने जेतेपदाच ट्रॉफी उंचावली. आता ८ महिन्यांनंतर भारतीय संघ पहिल्यांदाच वनडे मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी शुबमन गिलची वनडे संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान गिलने रोहित शर्माबाबत मोठं वक्तव्य केलं. आहे.
शुबमन गिल म्हणाला, “बाहेर जी चर्चा सुरू आहे, ती वेगळी आहे. आमच्या दोघांच्या नात्यात कुठलाही बदल झालेला नाही. तो (रोहित शर्मा) मला नेहमी मदत करतो. त्याच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याला काही सांगावं वाटलं की तो मला आवर्जून सांगतो.”
रोहित शर्मा आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. त्यामुळे गिलला रोहितकडून खूप काही शिकण्याची संधी मिळेल. याबाबत बोलताना गिल म्हणाला, “मला जर काही विचारायचं असेल तर मी थेट त्याच्याकडे जातो आणि त्याचं मत विचारतो. अशी परिस्थिती असताना त्याने काय निर्णय घेतला असता, हे मी त्याला विचारतो.” गिलची वनडे संघाचा कर्णधार म्हणून पहिलीच मालिका असणार आहे. यासह रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी ८ महिन्यांनंतर पुनरागमन करताना दिसणार आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडी डावाची सुरूवात करताना दिसेल. आता वनडे संघाचा कर्णधार म्हणून गिल कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.