ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला ७ विकेट्सने मोठा पराभव पत्करावा लागला. पावसामुळे ४ वेळा थांबलेला हा सामना अखेरीस २६ षटकांचा खेळवण्यात आला आणि भारताने खराब सुरूवातीनंतर निर्धारित षटकांत १३६ धावा केल्या. पण डीएलएसमुळे ऑस्ट्रेलियाला १३१ धावांचे लक्ष्य मिळाले, जे संघाने २१ षटकांत पूर्ण केले. भारताच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, पण झटपट विकेट्स न घेतल्याने सामना हातातून निसटला. दरम्यान भारताच्या माजी खेळाडूने कोच गंभीरला संघाच्या विजयासाठी स्पष्ट मेसेज दिला आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिका सुरू होण्यापूर्वी, टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी हर्षित राणा यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल माजी भारतीय सलामीवीर आणि मुख्य निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांना फटकारले होते. आता या पराभवानंतर, श्रीकांत यांनी स्वतः गंभीर आणि संघ व्यवस्थापनाला मेसेज पाठवला आहे, ज्यामध्ये भारताच्या बाजूने सामन्याचा निकाल लागण्यासाठी अंतिम अकरा संघात मोठा बदल करण्याची आवश्यकता आहे असं सुचवलं आहे.
श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्याची मागणी केली आहे. त्याने असंही म्हटलं आहे की भारताने तिन्ही फिरकीपटू कुलदीप, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना सामन्यात खेळवावं, कारण ते अधिक प्रभावी ठरतील. त्यांनी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियासाठी प्रभावी ठरलेल्या मॅथ्यू कुहनेमनचे उदाहरण देखील दिले.
“स्टार्क आणि हेझलवूड वगळता ऑस्ट्रेलियाला महत्त्वाच्या विकेट्स कोणी मिळवून दिल्या? तो कुहनेमन होता. अक्षरनेही संघासाठी एक महत्त्वाची विकेट घेतली. फिरकीपटूंनी चांगली कामगिरी केली,” असं श्रीकांत म्हणाले.
“मनगटी फिरकी गोलंदाज नेहमीच सामना जिंकून देण्याची क्षमता ठेवतात. ते नेहमी संघासाठी चांगली कामगिरी करत आले आहेत. मग कुलदीपला प्लेईंग इलेव्हनमधून का वगळलं, यामागचं कारण मला अजिबात समजलं नाही. मी असतो, तर अजूनही कुलदीप, वॉशिंग्टन आणि अक्षर या तिघांनाच खेळवलं असतं,” असं स्पष्ट मत कृष्णमाचारी श्रीकांत यांनी मांडलं.
श्रीकांत यांनी कुलदीप यादवच्या टी-२० मधील कामगिरीचे, विशेषतः आशिया चषक आणि अलीकडे झालेल्या कसोटी मालिकेतील योगदानाचं कौतुक केलं. त्याचबरोबर त्यांनी संघ व्यवस्थापनावर टीका करत, प्लेइंगमध्येआठ फलंदाजांना संधी देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं.
त्याने कसोटी सामन्यांमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे, आशिया कपमध्येही त्याने जबरदस्त कामगिरी केली. टी२० सामन्यांमध्येही तो सातत्याने चांगला खेळतोय आणि तरीही तुम्ही म्हणता की ऑस्ट्रेलियातील विकेटवर चेंडू टर्न होत नाही, त्यामुळे कुलदीप यादवला खेळवलेलं नाही, हे मला अजिबात पटत नाही,” असं कृष्णमाचारी श्रीकांत म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “असं विधान करणं धक्कायदायक आहे, मला हे बिलकुल पटलं नाही. संघ संयोजन आणि आठ फलंदाज यांचं गणित विसरा, संघात सर्वोत्तम खेळाडू असायला हवेत. शेवटी, आठव्या क्रमांकाचा फलंदाज तुम्हाला किती धावा करून देणार आहे?”