Rohit Sharma Pull Shot: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा वनडे सामना अॅडलेडच्या मैदानावर सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. पण दुसऱ्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार पुनरागमन केलं. सलामीला आलेल्या रोहित शर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. यादरम्यान त्याने २ पुल शॉट मारले, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातही सुरूवातीच्या काही षटकांमध्ये फलंदाजी करणं भारतीय फलंदाजांसाठी आव्हानात्मक होतं. पण रोहित शर्माने एक बाजू धरून ठेवली. सलामीला आलेला शुबमन गिल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर एकाच षटकात विराट कोहली शून्यावर बाद होऊन माघारी परतला. पण त्यानंतर रोहित शर्माने श्रेयस अय्यरसोबत मिळून दमदार शतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर त्याने भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं.

रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीासाठी ओळखला जातो. पण पुनरागमन केल्यानंतर पहिल्या सामन्यात त्याला हवी तशी सुरूवात करून देता आली नव्हती. पहिल्या सामन्यात तो अवघ्या ८ धावा करून माघारी परतला. पण दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या फलंदाजी करण्याच्या स्टाईलमध्ये थोडा बदल केला. त्याने सुरूवातीचे चेंडू खेळून काढले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्ला चढवला. यादरम्यान त्याने आपले २ ट्रेडमार्क पुल शॉट मारले आणि चेंडू स्टँड्समध्ये पोहोचवले.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यरची जोडी मैदानावर होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडून १९ वे षटक टाकण्यासाठी मिचेल ओवेन गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर रोहितने आपला ट्रेडमार्क पुल शॉट मारून सुरूवात केली. हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पडला. त्यानंतर पुढचा चेंडू त्याने खेळून काढला. त्यानंतर षटकातील तिसरा चेंडू देखील त्याने पुल शॉट मारून सीमारेषेपार पोहोचवला. रोहित ज्यावेळी फॉर्ममध्ये असतो, त्यावेळी तो असे फटके मारतो. या डावात फलंदाजी करताना त्याने दमदार अर्धशतकी खेळी केली.