scorecardresearch

IND vs BAN 2nd Test: नाताळानिमित्त टीम इंडियाकडून चाहत्यांना मालिका विजयाचं गिफ्ट! मीरपूर कसोटी जिंकली; मालिका २-० ने खिशात

भारत-बांगलादेश यांच्यातील रोमांचक झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर आणि आर. अश्विनने झुंजार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

IND vs BAN 2nd Test: नाताळानिमित्त टीम इंडियाकडून चाहत्यांना मालिका विजयाचं गिफ्ट! मीरपूर कसोटी जिंकली; मालिका २-० ने खिशात
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून (२२ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात होता. मीरपूर कसोटीत टीम इंडिया संकटात सापडली होती. दोलायमान होत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान बांगलादेशवर ३ गडी राखून संपूर्ण भारतवासीयांना ख्रिसमसची विजयी भेट दिली. रोमांचक झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर आणि आर. अश्विनने झुंजार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. ४५ धावांवर ४ गडी बाद असलेल्या भारताला चौथ्या दिवशी सकाळी सुरुवात केल्यानंतर मेहदी हसन मिराजने जबरदस्त हादरे दिले. मात्र अय्यर आणि अश्विन यांनी टीम इंडियाला विजयापर्यंत पोहोचवले. रविचंद्रन अश्विन ला सामनाविराच्या तर चेतेश्वर पुजाराला मालिकाविराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

भारत या दुसऱ्या डावात १४५ धावांचा पाठलाग करण्यासाठी काल जेव्हा मैदानात उतरला तेव्हा त्यांची सुरुवात अतिशय खराब झाली होती. सलामीवीर कर्णधार लोकेश राहुल (२), चेतेश्वर पुजारा (६), शुबमन गिल (७) आणि विराट कोहली (१) हे झटपट बाद झाल्याने टीम इंडिया अत्यंत नाजूक स्थितीत आली होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने ४ बाद ४५ धावांपर्यंत मजल मारली होती. तिथून पुढे आज चौथ्या दिवशी मैदानात उतरल्यानंतर अवघ्या २९ धावात ३ गडी गमावले.

नाईट वॉचमन म्हणून आलेला जयदेव उनाडकट १३ धावा करून बाद झाला. तर खेळपट्टीवर बराच काळ तग धरून असलेला अक्षर पटेल देखील फारशी चमक दाखवू शकला नाही. ३४ धावांवर त्याला मिराजने त्रिफळाचीत केले. पहिल्या डावात उत्कृष्ट खेळी करणारा ऋषभ पंत अवघ्या ९ धावा करून पायचीत झाला. मात्र त्यानंतर अश्विन आणि अय्यरने ७१ धावांची विजयी भागीदारी करत भारताची १४५ धावसंख्या गाठून दिली. अश्विनने ४२ धावा तर श्रेयस अय्यरने २९ धावांचे योगदान दिले. बांगलादेशकडून मेहदी हसन मिराजने सर्वाधिक ५ गडी बाद केले. कर्णधार शाकीब अल हसनने त्याला २ गडी बाद करत साथ दिली.

तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा निर्णय पूर्णपणे बरोबर असल्याचे सामन्यातील परिस्थितीवरून दिसत होते, कारण भारतीय संघ धावांचा पाठलाग करताना अतिशय नाजूक अवस्थेत होता. यजमानांचा पहिलाच डाव २२७ धावसंख्येवर उरकला. दुसऱ्या डावातही त्यांना साजेशी कामगिरी करता आली नाही. संपूर्ण संघ अवघ्या २३१ धावांवर गारद झाला.

काल चहापानापर्यंत लिटन दासने अर्धशतकी खेळी करत बांगलादेशला १९५ धावांपर्यंत पोहचवले होते.चहापानानंतर लिटन दास आणि टस्किन अहमदने आठव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचत बांगलादेशला २०० च्या पार पोहचवले. मात्र अखेर मोहम्मद सिराजने लिटन दासला ७३ धावांवर बाद केले. दास बाद झाल्यानंतर बांगलादेशचा डाव लगेच संपेल असे वाटले होते. मात्र तस्कीन अहमदने फटकेबाजी करत बांगलादेशला २३१ धावांपर्यंत पोहचवले. अखेर खलील अहमद ४ धावांवर धावबाद झाला अन् बांगलादेशचा डाव २३१ धावांवर संपला. तस्कीन अहमदने नाबाद ३१ धावा केल्या. तत्पूर्वी, या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात २२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ३१४ धावा केल्या होत्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 10:57 IST

संबंधित बातम्या