IND vs ENG 4th Test Day 3 Live Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने कमालीची फटकेबाजी करत भारताच्या गोलंदाजांना विकेटसाठी फार मेहनत करायला लावली. यासह इंग्लंडने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७ बाद ५४४ धावा केल्या आहेत. इंग्लंडच्या वरच्या फलंदाजी फळीने उत्कृष्ट फलंदाजी केल्याने इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला आहे. इंग्लंडच्या ४ फलंदाजांनी अर्धशतकं केली. तर जो रूटने १५० धावांची खेळी केली. यासह इंग्लंडकडे आता १८६ धावांची मोठी भागीदारी आहे. बेन स्टोक्स ७७ तर लियाम डॉसन २१ धावा करत खेळत आहेत.
सिराजने वोक्सला केलं बोल्ड
मोहम्मद सिराजने कमालीच्या चेंडूवर वोक्सला क्लीन बोल्ड करत सामन्यातील आपली पहिली विकेट मिळवली.
बुमराहच्या खात्यात पहिली विकेट
जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात जेमी स्मिथला झेलबाद करत सामन्यातील पहिली विकेट मिळवली आहे. बुमराहच्या गोलंदाजीवर स्मिथ चेंडू खेळायला गेला पण चेंडू बॅटची कड घेत यष्टीरक्षकाकडे गेला आणि ध्रुव जुरेलने कमालीचा झेल टिपला.
जो रूट बाद
जो रूट १५० धावा करताच रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्टम्पिंग होत बाद झाला. ध्रुव जुरेलने पुन्हा एकदा विकेटच्या मागे चांगली कामगिरी केली आहे.
बेन स्टोक्स
जो रूटसह शतकी भागीदारी रचत चांगला फलंदाजी करत असलेला बेन स्टोक्स अचानक मैदानाबाहेर गेला आहे. बेन स्टोक्स रिटायर्ड हर्ट झाला असून जेमी स्मिथ फलंदाजीला उतरला आहे. बेन स्टोक्सला गेला बराच काळ पायात क्रॅम्प येत होते, हॅमस्ट्रिंगमध्ये कदाचित दुखापत असावी; अशी चर्चा आहे. स्टोक्सला विकेटदरम्यान धावताना नीट चालताही येत नव्हतं आणि त्यामुळे तो अखेरीस मैदानाबाहेर गेला आहे.
बेन स्टोक्सचं अर्धशतक
बेन स्टोक्सने जो रूटला चांगली साथ देत ९७ चेंडूत अर्धशतक केलं आहे. स्टोक्सचं हे ३६वं अर्धशतक आहे. यासह इंग्लंडची आघाडी १२० धावांवर पोहोचली आहे.
रूट-स्टोक्सची शतकी भागीदारी
जो रूट आणि बेन स्टोक्स यांनी शतकी भागीदारी करत इंग्लंडची आघाडी १०० धावांच्या पुढे नेली आहे. स्टोक्स अर्धशतकाच्या जवळ आहे, तर रूटने १३३ धावा केल्या आहेत.
टीब्रेक
जो रूटने कमालीची फलंदाजी करत इंग्लंडचा डाव उचलून धऱला आहे. यासह इंग्लंडने टीब्रेकपर्यंत ४ बाद ४३३ धावा केल्या आहेत. यासह इंग्लंडकडे ७५ धावांची आघाडी आहे. रूट आणि स्टोक्सने कमालीची फलंदाजी करत ८४ धावांची भागीदारी रचली आहे.
जो रूटची विक्रमी खेळी सुरूच
जो रूटने शतकानंतर १२० धावा करताच अजून एक विक्रम आपल्या नावे केला आहे. जो रूटने याच खेळीत काही वेळापूर्वी जॅक कॅलिसला मागे टाकत कसोटीत तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. यानंतर आता १२० धावा करताच त्याने रिकी पॉन्टिंगला मागे टाकत कसोटीत सर्वाधिक धावा करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापुढे आता फक्त सचिन तेंडुलकर आहे.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे जगातील फलंदाज
सचिन तेंडुलकर – १५,९२१ धावा
जो रूट – १३,३७९ धावा
रिकी पॉन्टिंग – १३,३७८ धावा
जॅक्स कॅलिस – १३,२८९ धावा
राहुल द्रविड – १३,२८८ धावा
जो रूटचं शतक
जो रूट भारताविरूद्ध पहिल्या डावात १८८ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. रूटचं कसोटीमधील हे ३८वं शतक आहे. तर भारताविरूद्ध सर्वाधिक कसोटी शतकं झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडच्या ४०० धावा पूर्ण, बुमराह मैदानाबाहेर
इंग्लंडने भारताची धावसंख्या मागे टाकत आघाडी मिळवली आहे. यासह इंग्लंडने आता ४०० धावा पूर्ण केल्या आहेत. जो रूट शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर स्टोक्सने रूटला चांगली साथ दिली आहे. दरम्यान जसप्रीत बुमराह मैदानाबाहेर गेला आहे. यादरम्यान साई सुदर्शन ड्रेसिंग रूममधून बुमराहबाबत काहीतरी अपडेट घेऊन आला. हे ऐकताच गिलही चकित झाला आहे. बुमराहने या सामन्यात सामान्य गोलंदाजी केली आहे आणि योग्य लाईन लेंग्थसह गोलंदाजी न केल्याचा फटका संघालाही बसला आहे.
वॉशिंग्टन सुंदरने भारताला मिळवून दिली विकेट
लंचब्रेकनंतर तिसऱ्या षटकात वॉशिंग्टनने ऑली पोपला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवू दिला. सुंदरच्या पहिल्याच चेंडूवर पोप फटका खेळायला गेला आणि चेंडू बॅटची कड घेत थेट स्लिपमध्ये गेला, जिथे राहुलने कमालीचा झेल टिपला. पोप १२८ चेंडूत ७ चौकारांसह ७१ धावा करत बाद झाला. काही वेळाने सुंदरने हॅरी ब्रूकला बाद करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली.
तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडने किती धावा केल्या?
इंग्लंड संघाने तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २८ षटकांत १०७ धावा केल्या आहेत. तर भारताला एकही विकेट मिळवता आलेली नाही. दरम्यान इंग्लंडने पहिल्या डावात आता २ बाद ३३२ धावा केल्या आहेत. तर भारताकडे फक्त २६ धावांची आघाडी आहे.
जो रूटचं अर्धशतक
कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमाकांचा फलंदाज जो रूट याने चौथ्या कसोटीत अर्धशतक झळकावत विक्रम केला आहे. जो रूट आता कसोटीमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमाकांचा फलंदाज ठरला आहे. रूटच्या नावे १०४ अर्धशतकं आहेत. तर सचिन तेंडुलकरच्या नावे ११९ अर्धशतकं आहेत.
ऑली पोपचं अर्धशतक
ऑली पोपने चौथ्या कसोटीत चांगली फलंदाजी करत ९४ चेंडूत ५१ धावा करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. याचबरोबर त्याने जो रूटसह शतकी भागीदारी रचली आहे.
जो रूट कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणार तिसरा फलंदाज
जो रूटने भारताविरूद्ध चौथ्या कसोटीत ३१ धावा करताच नवा इतिहास लिहिल आहे. जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. रूटने आता १३,२९० धावा केल्या आहेत. त्याच्याआधी रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर आहेत.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू
भारत-इंग्लंड मँचेस्टर कसोटीतील तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात झाली आहे. जो रूट आणि ऑली पोपची जोडी मैदानात आहे, तर भारताकडून शार्दुल ठाकूरने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. तर बुमराहच्या दिवसाचील पहिल्याच षटकातील पहिल्या चेंडूवर जो रूटने चौकार लगावत सुरूवात केली आहे.
मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी काय घडलं?
मँचेस्टर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पायाला दुखापत झालेली असतानाही भारताचा यष्टीरक्षक फलंदाज पुन्हा फलंदाजी उतरला. यासह भारतीय संघ पहिल्या डावात ३५८ धावा करत सर्वबाद झाला. यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी प्रत्युत्तरात बॅझबॉल शैलीत फटकेबाजी करत वेगाने धावा केल्या. जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी १५० अधिक धावांची भागीदारी रचली. तर रवींद्र जडेजाने क्रॉलीला बाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर अंशुल कंबोजने बेन डकेटला बाद करत कसोटी कारकिर्दीतील त्याची पहिली विकेट मिळवली.