India vs England 5th Test Playing 11 : आजपासून (१ जुलै) एजबस्टन येथे भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना खेळला जाणार आहे. यासाठी यजमान इंग्लंडने ‘प्लेइंग ११’ची घोषणा केली आहे. तर, रोहित शर्माच्या अनुपस्थितीमध्ये जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. अशा परिस्थितीत शुबमन गिलसोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न आहे. रोहितच्या जागी मयंक अगरवालला बोलावण्यात आले आहे. पण, तो खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शुबमन गिलसोबत चेतेश्वर पुजारा किंवा केएस भरत भारतीय डावाला सुरुवात करतील, असे मानले जात आहे.

पुजाराने सलामी दिल्यास हनुमा विहारी किंवा श्रेयस अय्यर या दोघांनाही खेळण्याची संधी मिळू शकते. अन्यथा, दोघांपैकी एकाला बाकावर बसावे लागेल. याशिवाय मधल्या फळीत विराट कोहली आणि ऋषभ पंत असतील. एजबस्टनमधील परिस्थिती बघता बुमराहच्या नेतृत्वाखालील संघामध्ये रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांनाही संधी मिळू शकते. दोघांमध्येही गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याची क्षमता आहे.

हेही वाचा – मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत

गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज खेळतील. गेल्या वर्षी शार्दुल ठाकूरने अष्टपैलू कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होणार आहे.

दरम्यान, यजमानांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघात जेमी ओव्हरटनच्या जागी जेम्स अँडरसनची निवड केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीसाठी अँडरसनला विश्रांती देण्यात आली होती.

बेन फॉक्सच्या जागी सॅम बिलिंग्स यष्टीरक्षण करताना दिसणार आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर आहे. मात्र, नवा कर्णधार बेन स्टोक्स आणि प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांच्या उपस्थितीत सध्याच्या इंग्लंड संघ कमलीच्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. या संघाने नुकताच न्यूझीलंडचा दारूण पराभव केला आहे.

भारताला हा सामना जिंकण्यासाठी कसून प्रयत्न करावे लागणार आहेत. भारतीय संघाने एजबस्टनच्या मैदानावर १९६७ इंग्लंडला कधीही पराभूत केलेले नाही. येथील खेळपट्टी सामान्यत: वेगवान गोलंदाज आणि काही प्रमाणात फलंदाजांसाठी अनुकुल असते. या हंगामात याठिकाणी झालेल्या चार काउंटी सामन्यांपैकी दोन सामने अनिर्णित राहिले आहेत तर इतर दोन सामन्यांत धावांचा यशस्वी पाठलाग करणे शक्य झाले आहे.

संभाव्य भारतीय संघ – जसप्रीत बुमराह (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन/शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंडने घोषित केलेला संघ – जॅक क्रॉली, अॅलेक्स लीस, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), सॅम बिलिंग्स (यष्टीरक्षक), मॅथ्यू पॉट्स, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, जेम्स अँडरसन.