IND vs ENG 3rd Test Updates: भारत वि. इंग्लंड तिसरा कसोटी सामना फारच अटीतटीचा होणार आहे. तिसरा कसोटी सामना हा क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सच्या क्रिकेट मैदानावर होणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर खेळणार आहेत. त्यामुळे या दोन्ही गोलंदाजांविरूद्ध फलंदाजी करणं दोन्ही संघांच्या फलंदाजांसाठी मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान लॉर्ड्स कसोटी सामना किती वाजता सुरू होणार आणि सत्रांच्या वेळा काय असणार, त्याचबरोबर सामना कुठे लाईव्ह पाहता येणार, जाणून घेऊया.
इंग्लंड संघाने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी जोफ्रा आर्चर तिसरा कसोटी सामना खेळणार असल्याचं जाहीर केलं. जोफ्रा आर्चर ४ वर्षांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघामध्ये परतणार आहे. त्यामुळे इंग्लंडचा गोलंदाजी विभाग अधिक मजबूत झाला आहे.
भारतीय संघाने एजबेस्टन कसोटीत ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर मोठ्या आत्मविश्वासासह तिसरा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. एजबेस्टनमध्ये इंग्लंडचा पराभव करणारा भारत पहिला आशियाई संघ ठरला. ज्यांनी नवख्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाखाली आणि जसप्रीत बुमराहशिवाय हा सामना जिंकला. तिसऱ्या सामन्यात बुमराह खेळताना दिसणार आहे. तर संघाचा कर्णधार गिलसह संपूर्ण फलंदाजी विभागही चांगली कामगिरी करत आहे. गिलने आतापर्यंत फक्त दोन सामन्यांमध्ये मालिकेत ५८५ धावा केल्या आहेत.
लॉर्ड्सच्या मैदानावर गोलंदाजांना मदत मिळते पण दोन्ही संघ चेंडूचा आणि खेळपट्टीचा कसा वापर करून घेणार यावर सर्व अवलंबून आहे. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने पाटा खेळपट्टी तयार करून घेतली होती. पण त्यांचा हा प्लॅन त्यांच्यावरच उलटा फिरला होता, कारण भारताने त्यांना विजयासाठी ६१८ धावांचे लक्ष्य दिले होते. जे इंग्लंड पूर्ण करू शकला नाही आणि भारताने ३३६ धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला.
भारत वि. इंग्लंड तिसरा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ही दुपारी ३ वाजता होईल. भारतामध्ये हा कसोटी सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्सच्या सर्व वाहिन्यांवर उपलब्ध असेल. तर मोबाईलवर जिओ हॉटस्टरवर लाईव्ह पाहता येणार आहे. भारतीय वेळेनुसार या कसोटी सामन्यांच्या सत्रांच्या वेळा कशा असतील, जाणून घेऊया.
भारत वि. इंग्लंड तिसरी कसोटी सत्र
पहिलं सत्र – दुपारी ३.३० ते ५.३०
लंचब्रेक – ५.३० ते ६.१०
दुसरं सत्र – ६.१० ते ८.१०
टीब्रेक – ८.१० ते ८.३०
तिसरं सत्र – ८.३० ते १०.३०