इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेच्या १५व्या हंगामात नवोदित गोलंदाजांपैकी सर्वात जास्त चर्चा उमरान मलिकची झाली. सनरायझर्स हैदराबादसाठी वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मलिकने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकून सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचले होते. उमरान मलिकला आज भारतीय संघाची जर्सी अंगावर घालण्याची संधी मिळाली आहे. भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यापूर्वी त्याला भारतीय संघाची टोपी देण्यात आली.

नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टी २० मालिकेसाठी उमरान मलिकची भारतीय संघात प्रथम निवड करण्यात आली होती. पण त्याला एकाही सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली नाही. आज उमरानला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत उमरानच्या पदार्पणाची पूर्वकल्पना दिली होती. तो म्हणाला होता की, “आम्हाला नवीन लोकांना संधी द्यायची आहे. जेणेकरून सर्वोत्तम संघ खेळताना दिसेल. या मालिकेत काही नवीन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली जाईल.”