Team India Creates History with Washington Sundar R Ashwin 10 Wickets: भारत वि न्यूझीलंड कसोटीत भारताच्या दोन फिरकीपटूंनी इतिहास घडवला आहे. नाणेफेक गमावत प्रथम गोलंदाजीसाठी उतरलेल्या भारताकडून पुण्याच्या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक गोलंदाजी केली. यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला पहिल्याच दिवशी २५९ धावांवर सर्वबाद केले. इतकेच नव्हे तर भारताने १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात कधीही न घडलेली कामगिरी आपल्या नावे केली आहे.
रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर या दोन्ही चेन्नईच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या संपूर्ण संघाला तंबूत धाडले. २०२१ नंतर कसोटी संघात पुनरागमन केलेल्या सुंदरने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच चकित केले. वॉशिंग्टन सुंदरने अश्विनबरोबर भेदक गोलंदाजी करत आपल्या तालावर किवी फलंदाजांना नाचवले. सुंदरने तर ७ पैकी ६ विकेट हे क्लीन बोल्ड करत घेतले.
हेही वाचा – Washington Sundar: कानामागून आला आणि ‘सुंदर’ झाला; ७ विकेट्ससह किवींची उडवली भंबेरी
रविचंद्रन अश्विनने सुरूवातीलाच एक विकेट घेत भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर अश्विनने झटपट ३ विकेट्स घेतले आणि लंच ब्रेकनंतर वॉशिंग्टन सुंदरने तर विकेट्सची रांगच लावली. वॉशिंग्टनने एकामागून एक ७ विकेट्स घेत न्यूझीलंडला ऑल आऊट करत त्याच्या फिरकीची जादू थांबली. अशारितीने भारताच्या दोन्ही ऑफस्पिन गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी सामन्यात संपूर्ण १० विकेट्स घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी फिरकीपटूंनी १० विकेट्स घेतल्या आहेत. पण फिरकीतही ऑफस्पिन गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांनी कसोटी सामन्यात संपूर्ण १० विकेट्स घेण्याची ही कसोटी इतिहासात पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा – IND vs NZ: रविचंद्रन अश्विनचा WTC इतिहासात मोठा पराक्रम, नॅथन लायनचा रेकॉर्ड मोडत ठरला नंबर वन गोलंदाज
भारताच्या फिरकीपटूंनी किती वेळा संपूर्ण १० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे?
चेन्नईच्या या दोन्ही गोलंदाजांनी भारताला मोठा विक्रम आपल्या नावे करण्यात मोठी भूमिका बजावली. यापूर्वी भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजी विभागाने संपूर्ण १० विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये २०२४ मध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या सामन्यात जडेजा, अश्विन आणि कुलदीप या तिघांनी १० विकेट्स घेतले होते. भारतीय क्रिकेटमध्ये यापूर्वी १९७३ मध्ये असे घडले होते, जेव्हा भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडविरुद्ध १० विकेट घेतले होते. पण भारताच्या फिरकीपटूंनी वर्षभरात दोनदा ही कामगिरी केली आहे. पुणे कसोटी आणि इंग्लंडविरूद्ध धर्मशाला कसोटीतही फिरकीपटूंनी संपूर्ण १० विकेट्स घेण्याची ही कामगिरी केली होती.
पहिल्यांदा भारतीय फिरकीपटूंनी १९५२ साली इंग्लंडविरुद्ध एका डावात संघाच्या सर्व दहा विकेट घेतल्या होत्या. यानंतर बरोबर चार वर्षांनंतर १९५६ मध्ये कोलकात्यात कांगारू फलंदाजांची भारतीय फिरकीपटूंसमोर अशीच अवस्था झाली होती. यानंतर १९६४ मध्ये चेन्नई कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दणका दिला होता. त्यानंतर १९७३ मध्ये इंग्लंडचा संघ भारताच्या फिरकीपटूंसमोर फेल झाला. २०१४ मध्येही भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी एकदा अशी कामगिरी केली आहे.