India vs Pakistan, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळाली. ४१ वर्षांत पहिल्यांदाच आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारत- पाकिस्तान सामना रंगला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानने १४६ धावा केल्या. भारतीय संघाला विजयासाठी १४७ धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना तिलक वर्माने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याला संजू सॅमसन आणि शेवटी शिवम दुबेने चांगली साथ दिली. शेवटी रिंकू सिंगने विजयी चौकार मारून भारतीय संघाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला.

भारतीय संघाचा फलंदाजीक्रम या स्पर्धेतील सर्वात मजबूत फलंदाजीक्रम आहे. त्यामुळे १४७ धावांचा पाठलाग करणं भारतीय संघासाठी फार कठीण नव्हतं पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीला चांगली गोलंदाजी केली. भारतीय संघातील टॉप ३ फलंदाज स्वस्तात माघारी परतले. गेल्या ३ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकं झळकावणारा अभिषेक शर्मा अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. तर शुबमन गिल १२ धावांवर आणि सूर्यकुमार यादव १ धाव करत माघारी परतला. एका बाजूने विकेट्स जात होत्या, पण तिलक वर्माने एक बाजू धरून ठेवली होती. आधी त्याने संजू सॅमसनसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. संजू सॅमसन २४ धावांवर बाद झाल्यानंतर त्याला शिवम दुबेची साथ मिळाली.दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. पण तिलक वर्मा शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने नाबाद ६९ धावांची खेळी केली.

भारत- पाकिस्तान सामन्यातील टर्निंग पाँईंट

या सामन्यावर पाकिस्तानने पूर्णपणे आपली पकड बनवून ठेवली होती. जर तिलक वर्मा बाद झाला असता, तर निकाल काहीतरी वेगळा लागला असता. पाकिस्तानला तिलक वर्माला बाद करण्याची सोपी संधी मिळाली होती. पण पाकिस्तानच्या कर्णधाराने ही संधी हातून घालवली. सामन्यातील १४ व्या षटकात तिलक वर्मा ३७ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी सईम अयुब गोलंदाजी करत होता. सईम अयुबने टाकलेला षटकातील शेवटचा चेंडू शिवम दुबेच्या बॅटची कडा घेत थर्ड मॅनच्या दिशेने गेला. तिलक आणि शिवमने वेगाने १ धाव पूर्ण केली. तिलक दुसरी धाव घेण्यासाठी धावला. पण शिवमने त्याला माघारी जाण्यास सांगितलं. नेमकं त्याचवेळी हसन अलीने वेगाने थ्रो केला. ज्यावेळी त्याने थ्रो केला त्यावेळी तिलक क्रीजच्या बाहेर होता. सलमान अली आगाने वेगाने स्टंपिग केली असती तर तिलक बाद होऊ शकला असता. पण नेमकं त्याचवेळी तिलकने डाईव्ह मारली आणि सलमान अली आगाने निवांत होऊन स्टंपिंग केली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. हा या सामन्यातील टर्निंग पाँईंट ठरला.

तर आणखी टर्निंग पाँईंट म्हणजे तिलक वर्माने पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज हरिस रौफची चांगलीच धुलाई केली. भारतीय संघाची धावसंख्या ८३ धावा असताना, हरिस रौफ १५ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकात तिलक वर्माने २ चौकार आणि १ षटकार मारून तिलकने १७ धावा वसूल केल्या. यासह भारतीय संघाने १०० धावांचा पल्ला गाठला. इथून पाकिस्तानचा संघ बॅकफूटवर गेला.