गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात प्रचंड प्रमाणात उष्णता वाढली आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये तर तापमान सातत्याने ४० अंशांच्या वरती जात आहे. दिल्लीतील काही ठिकाणी पारा ४५ अंशांपर्यंत गेल्याची नोंद झाली आहे. सायंकाळी सुद्धा तापमानात विशेष घट होत नाही. अशा स्थितीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज (९ जून) दिल्लीमध्ये टी ट्वेंटी सामना खेळवला जाणार आहे. मात्र, दिल्लीतील वातावरणाचा विचार करून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आजच्या सामन्यासाठी एक नवीन नियम लागू केला आहे. दिल्ली टी ट्वेंटी सामन्या दरम्यान प्रत्येक १० षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने पत्रकार परिषदेत दिल्लीतील उष्माविषयी चिंता व्यक्त केली होती. ‘दिल्लीतील हवामान उष्ण असेल याची आम्हाला कल्पना होती पण, ते इतके जास्त असेल अशी अपेक्षा नव्हती. सुदैवाने सामना सायंकाळी उशिरा आहे. त्यामुळे खेळाडूंना स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तरी देखील दिल्लीतील उष्णतेचा सामना करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे’, असे तो म्हणाला होता. शिवाय, दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेज शम्सीने तर थेट ट्विट करून दिल्लीतील उष्णतेचा त्रास जाहीर केला होता.

हेही वाचा – IND vs SA T20 Series : ‘कर्णधारपद तर मिळाले पण…,’ जाणून घ्या काय म्हणाला भारतीय संघातील खेळाडू

दक्षिण आफ्रिकेच्या संघासोबतच भारतीय खेळाडूंनादेखील दिल्लीतील उष्णतेची झळ बसली. संघाने दुपारी सराव करण्याऐवजी सायंकाळी सराव करण्याला प्राधान्य दिले होते. ही गोष्ट लक्षात घेऊन दोन्ही संघातील खेळाडूंनी ड्रिंक्स ब्रेकसाठी विनंती केली होती, असे म्हटले जात आहे. त्याला बीसीसीआयने परवानगी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिस्थितीचा आढावा घेऊन एखाद्या सामन्यासाठी नवीन नियम लागू करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी, युएईमध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषका दरम्यान आयसीसीने सामन्यादरम्यान ड्रिंक्स ब्रेक देण्याचा निर्णय घेतला होता. टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात डावाच्या मध्यभागी ब्रेक घेण्याची ती पहिलीच वेळ होती.