भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका सध्या सुरू आहे. त्यातील पहिला सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आणि दुसरा सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात आला. हे दोन्ही सामने पाहुण्या दक्षिण आफ्रिकन संघाने आपल्या खिशात घातले आहेत. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान भारतीय संघ २-० ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यात दोनशेपेक्षा जास्त धावा करूनही भारतीय संघाला पराभव बघावा लागला तर दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली. त्यामुळे अनेक नवख्या खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाला अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती मारक ठरतेय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात येण्यापूर्वी सर्व भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा खेळण्यात व्यस्त होते. ही स्पर्धा जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ चालली. त्यानंतर आफ्रिकेविरुद्ध जेव्हा संघ निवडण्यात आला तेव्हा माजी कर्णधार विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह व रविचंद्रन अश्विन यांना विश्रांती देण्यात आली. पुढे होणारा इंग्लंड दौरा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या चार खेळाडूंव्यतिरिक्त अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा दुखापतीमुळे या टी ट्वेंटी मालिकेसाठी उपलब्ध होऊ शकला नाही.

हेही वाचा – IND vs SA 2nd T20 : क्लासेनच्या क्लाससमोर भारतीय संघ फेल, आफ्रिकेविरुद्ध भारताचा सलग दुसरा पराभव

अनुभवी खेळाडूंच्या जागी ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, आवेश खान, उमरान मलिक, अर्शदीप सिंग या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर, रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाचे नेतृत्व के एल राहुलच्या हाती देण्यात आले. मात्र, आपल्या क्रिकेट कारकीर्दीत सतत दुखापतीमुळे बाहेर राहणारा राहुल यावेळीही त्याच कारणाचा बळी ठरला. पहिल्या सामन्याच्या पूर्व संध्येला दुखापतीमुळे त्याला मालिकेबाहेर पडावे लागेल. तो एकटा काय कमी होती की त्याच्यासोबत ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवही याच कारणामुळे बाहेर गेला. अशा आणीबाणीच्या स्थितीत ऋषभ पंतकडे कर्णधार पदाची आणि हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली.

हेही वाचा – ‘प्रति सामना प्रसारण शुल्काच्याबाबतीत आयपीएल नविन उंची गाठेल’, जय शाह यांनी व्यक्त केला विश्वास

पंत आणि पंड्या दोघांना आयपीएल स्पर्धेमध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे. मात्र, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करण्यात नक्कीच फरक असतो. आंतरराष्ट्रीय सामना खेळताना साहजिक संपूर्ण संघ एका अलिखित दबावाखाली असतो. अशा वेळी संघातील अनुभवी खेळाडूंचा फायदा होतो. सध्याच्या स्थितीचा विचार केल्यास रोहित शर्मा आणि केएल राहुल ज्यापद्धतीने सलामी देण्याची क्षमता ठेवतात तशीच १०० टक्के क्षमता किशन आणि गायकवाड या जोडीकडे आहे, असे म्हणता येणार नाही. रोहित आणि राहुलकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव जास्त नक्कीच जास्त आहे. शिवाय, या दोघांपैकी एक खेळाडू जर लवकर बाद झाला तर तिसऱ्या क्रमांकासाठी विराट कोहलीसारखा भरभक्कम खेळाडू आहे. जरी तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये नसला तरी संघामध्ये त्याचे नाव असणेदेखील फार मोठी गोष्ट आहे. पहिले तीन फलंदाज चांगली कामगिरी करणारे असतील तर साहजिक मधल्या फळीवर कमी दबाब पडतो.

याच प्रमाणे गोलंदाजीचा विचार केला तर सध्याच्या संघामध्ये युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार हे दोनच गोलंदाज असे आहेत ज्यांना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा चांगला अनुभव आहे. इतर सर्व गोलंदाज देशांतर्गत स्पर्धा खेळणारे आहेत. त्यात भरीस भर म्हणजे ते गेल्या अडीच महिन्यांपासून सातत्याने क्रिकेटच खेळत आहेत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतोच, ही गोष्ट येथे लागू पडते. या शिवाय, कर्णधार ऋषभ पंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या खेळाडूंचा प्रभावीपणे वापर करताना कुठेतरी गोंधळून जात आहे, असेही निदर्शनास येत आहे. त्याची परिणीती संघाला मिळणाऱ्या पराभवामध्ये दिसत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूणच काय तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या खेळणाऱ्या टी ट्वेंटी संघाला अनुभवी खेळाडूंची कमतरता जाणवत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.