हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ११ धावांनी मात केली. या विजयासह ५ सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघाने १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताच्या दिप्ती शर्माने ‘एकदम कडक’ गोलंदाजी करत आफ्रिकेच्या फलंदाजांची पिसं काढली. दिप्ती शर्माने अभूतपूर्व कामगिरी करत ३ षटकात ३ बळी घेतले. पण त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे या सामन्यात तिने शून्य धावा देत हे ३ गडी पटकावले.
18 balls, 18 dots & 3 wickets.@Deepti_Sharma06 on an absolute roll in Surat. @Paytm #INDWvSAW
Details – https://t.co/QFRNkBAGt9 pic.twitter.com/q1w20ULMkv
— BCCI Women (@BCCIWomen) September 24, 2019
नाणेफेक जिंकून आफ्रिकेची कर्णधार सुने लुसने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरुवातही अडखळती झाली. आपल्या कारकिर्दीचा पहिलाच सामना खेळणारी शाफाली वर्मा भोपळाही न फोडता माघारी परतली. शबनिम इस्माईलने तिचा बळी घेतला. यानंतर मराठमोळी स्मृती मंधाना आणि जेमायमा रॉड्रीग्ज यांनी छोटेखानी भागीदारी करत भारतीय महिला संघाचा डाव सावरला. मात्र चांगल्या फॉर्मात असलेली स्मृती मंधाना २१ धावा काढून माघारी परतली. यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौरने आपल्या सहकाऱ्यांना हाताशी धरत भारताला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. एकीकडे भारतीय फलंदाज माघारी परतत असताना हरमनप्रीतने ३४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ४३ धावांची खेळी केली. २० षटकांत १३० धावांपर्यंत मजल मारलेल्या भारतीय महिलांनी आफ्रिकेला विजयासाठी १३१ धावांचं आव्हान दिलं.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या आफ्रिकन महिला संघाची सुरुवात आश्वासक झाली होती. लिझेल ली आणि टॅझमिन ब्रिट्स यांनी भारतीय गोलंदाजांचा संयमाने सामना केला. मात्र नंतर दिप्ती शर्माने आफ्रिकन फलंदाजीचाा कणा मोडला. तिला शिखा पांडे, पूनम यादव आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २-२ बळी टिपत चांगली साथ दिली. तर हरमनप्रीत कौरने एक बळी घेतला आणि सामन्यात ११ धावांनी विजय मिळवला.