भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेची सुरुवात आज गुवाहाटी येथे होणार्‍या पहिल्या सामन्याने होत आहे. या सामन्यात भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे लक्ष्य असेल क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमावर. देशात सर्वाधिक शतके ठोकण्याचा हा विक्रम आहे. २०११ पासून सचिन तेंडुलकर या विक्रमावर विराजमान आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत कोहलीने शतक ठोकल्यास तो सचिनच्या विक्रमाची बरोबरी करेल. भारतीय वरिष्ठ खेळाडूंना श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती, ज्यात कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या मोठ्या नावांचा समावेश होता. आता हे सर्व खेळाडू फ्रेश होऊन संघात परतत आहेत.

घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकर २० शतकांसह अव्वल स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर शेवटचे शतक झळकावले होते. दुसरीकडे, विराट कोहलीबद्दल बोलायचे झाले तर ही रन मशीन १९ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने भारतात खेळल्या गेलेल्या १०१ सामन्यांमध्ये हा पराक्रम केला आहे.

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: रोहित-विराटचे भारतीय संघात पुनरागमन; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना

त्याचवेळी सचिनने १६४ सामन्यांमध्ये ही शतके झळकावली आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमला तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग चौथ्या स्थानावर आहे.

घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके झळकावणारे खेळाडू –

१. सचिन तेंडुलकर – २०
२. विराट कोहली-१९*
३. हाशिम आमला – १४
४. रिकी पाँटिंग १३

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या स्थान मिळवण्याची संधी –

याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप ५ फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीलाही स्थान मिळण्याची मोठी संधी आहे. कोहलीने २६५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५७.४७ च्या सरासरीने १२४७१ धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली सध्या सहाव्या स्थानावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत त्याने १८० धावा केल्या, तर तो पाहुण्या संघाचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेला मागे टाकेल. तसेच या यादीत पाचव्या स्थानावर पोहोचेल. जयवर्धनेने १२६५० धावा केल्या आहेत.