Abhishek Sharma Record: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकात २०२ धावांचा डोंगर उभारला. ही आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. दरम्यान भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने ६१ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
अभिषेक शर्माने या स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर नोंदवला आहे.हे त्याचं गेल्या ३ सामन्यातील सलग तिसरं अर्धशतक झळकावलं. या सामन्यातही त्याच्याकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण तो झेलबाद होऊन माघारी परतला. अभिषेक शर्मा हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागोपाठ ३ अर्धशतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी हा पराक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराटने देखील लागोपाठ ३ सामन्यांमध्ये ३ अर्धशतकं झळकावली होती. तर केएल राहुल आणि अभिषेक शर्माने हा पराक्रम २ वेळा करून दाखवला आहे.
या दमदार खेळीसह अभिषेक शर्माच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने सलग ७ डावात ३० पेक्षा अधिक धावा करण्याच्या बाबतीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि भारताच्या रोहित शर्माच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मोहम्मद रिझवानने २०२१ मध्ये हा पराक्रम केला होता. तर रोहित शर्माने २०२१-२२ मध्ये या विक्रमाला गवसणी झाली होती. आता अभिषेक शर्माने २०२५ मध्ये या विक्रमाची बरोबरी केली आहे. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात ३० पेक्षा अधिक धावांची खेळी करून अभिषेक शर्माकडे हा विक्रम मोडून काढण्याची संधी असणार आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांअखेर २०२ धावा केल्या. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने सर्वाधिक ६१ धावांची खेळी केली. तर शेवटपर्यंत टिकून राहिलेल्या तिलक वर्माने नाबाद ४९ धावांची खेळी केली.