यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये सुपर-४ फेरीत भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना झाला. दोन्ही संघ तूल्यबळ असल्यामुळे शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीची लढत झाली. मात्र या सामन्यात श्रीलंकेचा सहा गडी राखून विजय झाला. भारताने सुरुवातीला फलंदाजीसाठी येत श्रीलंकेसमोर विजयासाठी १७४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेने ही धावसंख्या कुशलतेने गाठली. श्रीलंकेच्या विजयामागे निसंका आणि मेंडिस या जोडीने अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली.
भारताने दिलेल्या १७४ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या पथुम निसांका (५२) आणि कुशल मेंडिस (५७) यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. दोघांनीही अर्धशतकी खेळी केल्यामुळे ११ षटकापर्यंत श्रीलंका संघ अतिशय चांगल्या स्थितीत होता. मात्र अवघ्या ९७ पासून ११० धावावर येईपर्यंत श्रीलंकेचे तब्बल चार गडी बाद झाले. चरित असलंका (०), दानुष्का गुनाथिलका (१) खास कमाल दाखवू शकले नाहीत. भानुका राजपक्षे आणि दासून शनाका शेवटपर्यंत नाबाद राहिले. शेवटच्या ५ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज असताना या दोघांनी कुशलतेने फलंदाजी केली. राजपक्षेने (नाबाद) २५ तर दासून (नाबाद) ३३ धावा केल्या.
हेही वाचा >> आधी म्हणाला फक्त धोनीचा मेसेज आला, आता पुन्हा केलं मोठं विधान; विराटच्या नव्या पोस्टची चर्चा
याआधी नाणेफेक जिंकून श्रीलंकेने सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फंलादाजीसाठी आलेल्या भारताची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात केएल राहुल अवघ्या सहा धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या विराट कोहलीनेदेखील निराशा केली. तो खातंही खोलू शकला नाही. मात्र रोहित शर्माने कर्णधार म्हणून आपली भूमिका चोखपणे पार पाडली. त्याने ४१ चेंडूंमध्ये चार षटकार आणि ५ चौकार लगावत ७२ धावा केल्या.
हेही वाचा >> आयपीएल गाजवलं, पण आशिया चषक स्पर्धेत फक्त एक चेंडू खेळला; दिनेश कार्तिकने शेअर केला जुना फोटो, म्हणाला…
रोहितला सूर्यकुमार यादवने साथ दिली. सूर्यकुमारने २९ चेंडूंमध्ये एक षटकार आणि एक चौकार लगावत ३४ धावा केल्या. रोहित आणि सूर्यकुमार वगळता भारताचा कोणताही खेळाडू खास कामगिरी करू शकला नाही. हार्दिक पंड्या, ऋषभ पंतने प्रत्येकी १७ धावा केल्या. दीपक हुडा अवघ्या ३ धावांवर बाद झाला. आर अश्विनने (नाबाद) शेवटच्या षटकांत मोठा फटका मारला. त्याने ७ चेंडूंमध्ये १५ धावा केल्या.
हेही वाचा >> Arshdeep Singh : अर्शदीपला ट्रोल करणाऱ्यांना सचिनचे सडेतोड उत्तर, क्रिकेटचा देव म्हणाला ‘देशासाठी खेळताना…’
भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटुंनी उत्तम कामगिरी केली.एकट्या युझवेंद्र चहलने श्रीलंकेच्या ११० धावा होईपर्यंत तीन फलंदाजांना बाद केले. त्याने एकूण तीन बळी घेतले. आर अश्विनने युझवेंद्रला साथ दिली. अश्वनने एक बळी घेतला.
तर श्रीलंकेच्या बाजूने दिलशान मधुशंकाने सर्वोत्त्तम कामगिरी केली. त्याने २४ धावा देत भारताच्या ३ फलंदाजांना बाद केले. चमिका करुणारत्नेनेही भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबुत पाठवले. त्याने रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांना बाद केले. कर्णधार दासून शनाकाने हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव या आघाडीच्या फलंदाजांना बाद करत भारताला खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला. माहीश तिक्षाणाने एक बळी घेतला.