Dhruv Jurel Catch Video, IND vs WI: आशिया चषक २०२५ स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. वेस्टइंडिजचा संघ २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान वेस्टइंडिजला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला आहे. सलामीला आलेला तेजनारायण चंद्रपॉल झेलबाद होऊन माघारी परतला. त्याला बाद करण्यासाठी यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने भन्नाट झेल घेतला.

या सामन्यात वेस्टइंडिजचा कर्णधार रोस्टन चेसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला. पण हा निर्णय सुरूवातीलाच फसला. संघातील प्रमुख फलंदाज तेजनारायण चंद्रपॉल चौथ्या षटकात बाद होऊन माघारी परतला. भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजी आक्रमणाची सुरूवात केली. तर झाले असे की, भारतीय संघाकडून चौथे षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज गोलंदाजीला आला. या षटकातील पाचवा चेंडू सिराजने लेग साईडच्या दिशेने टाकला. हा चेंडू तेजनारायण चंद्रपॉलने फाईन लेगच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेत यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या हातात गेला. जुरेलने उजव्या दिशेने डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वेस्टइंडिजला सुरूवातीलाच २ मोठे धक्के

वेस्टइंडिजचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सुरूवातीला पूर्णपणे फसला. कारण सलामी जोडीला हवी तशी सुरूवात करून देता आलेली नाही. सिराजच्या गोलंदाजीवर तेजनारायण चंद्रपॉल ११ चेंडू खेळून शून्यावर माघारी परतला. तर दुसरीकडे जॉन कॅम्पबेलने १९ चेंडूंचा सामना करत ८ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर ध्रुव जुरेलने झेल घेतला. अवघ्या २० धावांवर वेस्टइंडिजला दुसरा मोठा धक्का बसला.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत- यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

वेस्टइंडिज- तेजनारायण चंदरपॉल, जॉन कॅम्पबेल, अलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (यष्टीरक्षक), रोस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, जोहान लेन, जेडेन सील्स