India vs West Indies 1st Test: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात वेस्टइंडिजचे फलंदाज ४ सत्र देखील फलंदाजी करू शकलेले नाही. या सामन्यातील पहिल्या डावात वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. या धावांच्या प्रत्तुत्तरात भारतीय संघाने ४४८ धावांचा डोंगर उभारून पहिला डाव घोषित केला. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या वेस्टइंडिजचा डाव अवघ्या १४६ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १ डाव आणि १४० धावांनी आपल्या नावावर केला.
या सामन्यात वेस्टइंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय पूर्णपणे फसला. कारण वेस्टइंडिजचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. वेस्टइंडिजच्या एकही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४, जसप्रीत बुमराहने ३, कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला.
भारतीय संघाने उभारला ४४८ धावांचा डोंगर
वेस्टइंडिजचा पहिला डाव स्वस्तात आटोपल्यानंतर भारतीय संघाला पहिल्याच दिवशी फलंदाजीला येण्याची संधी मिळाली. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या यशस्वी जैस्वालने ३६ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने दमदार शतक झळाकावलं. साई सुदर्शन अवघ्या ७ धावा करत माघारी परतला. तर कर्णधार शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. शेवटी ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजाने मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. ध्रुव जुरेलने १२५ खेळी केली. तर रवींद्र जडेजा १०४ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाने पहिला डाव ५ गडी बाद ४४८ धावांवर घोषित केला.
भारतीय संघाचा १ डाव १४० धावांनी विजय
भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या वेस्टइंडिजला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. वेस्टइंडिजकडून अथेंजने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला.दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मोहम्मद सिराजने ३, कुलदीप यादवने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ गडी बाद केला. यासह हा सामना १ डाव १४० धावांनी आपल्या नावावर केला. यासह २ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.