Rohit Sharma’s statement on the playing eleven of the second test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. भारताने या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला होता. शेवटचा आणि दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून सुरु होणार आहे. तत्पुर्वी दुसऱ्या सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनवर कर्णधार रोहित शर्माने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने टीम इंडियाच्या खेळाडूंचेही कौतुक केले आहे. खेळपट्टी आणि परिस्थिती पाहून प्लेइंग इलेव्हन ठरवले जाईल, असे रोहितचे म्हणणे आहे.
प्लेइंग इलेव्हनमध्ये बहुधा कोणताही बदल होणार नाही, असे रोहितचे मत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीनुसार, रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला डॉमिनिकामधील खेळपट्टी आणि स्थितीची चांगलीच कल्पना होती. येथे पावसाबाबत स्पष्टता नाही. परंतु प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठा बदल होईल, असे मला वाटत नाही. मात्र येथील स्थिती आणि खेळपट्टीचा विचार करून निर्णय घेतला जाईल.”
रोहित शर्माने भारतीय संघातील खेळाडूंचेही कौतुक केले. तो म्हणाला, “आज ना उद्या बदल नक्कीच होतो. पण आमच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली याचा मला आनंद आहे. खेळाडूंची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच संघात त्याची भूमिका काय असेल हेही स्पष्ट केले आहे. त्यानंतर ते कसे तयारी करतात आणि कामगिरी कशी करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे.”
विशेष म्हणजे पहिल्या कसोटीत भारताने ४२१ धावा करून पहिला डाव घोषित केला होता. यशस्वी जैस्वालने टीम इंडियासाठी १७१ धावांची शानदार खेळी केली. त्याने ३८७ चेंडूंचा सामना करत १६ चौकार आणि १ षटकार लगावला. त्याचबरोबर रोहित शर्माने १०३ धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी दोनशेपेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. विराट कोहलीने ७६ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात १५० आणि दुसऱ्या डावात १३० धावांवर गारद झाला होता.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, श्रीकर भारत, इशान किशन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार
वेस्ट इंडिजचा संघ: क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उप-कर्णधार), अलिक अथानेज, टॅगिनेरयन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ दा सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, केमार रोच, केविन सिंक्लेअर, जोमेल वॉरिकन.
