भारतीय संघ ३ ऑगस्टपासून विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ३ टी २०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामने खेळण्यात येणार आहेत. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची रविवारी निवड करण्यात आली. निर्धारित षटकांसाठी वेगळा आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार अशी पद्धत भारतीय संघात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण तीनही प्रकारांमध्ये विराट कोहली याच्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धूरा सोपावण्यात आली आहे. याबरोबरच टीम इंडियाच्या संघात एक बाब प्रथमच घडली आहे.

भारतीय संघ या दौऱ्यात पहिले ३ टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, राहुल चहर, दिपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदिप सैनी आणि खलिल अहमद यांसारख्या अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यापैकी राहुल चहर, दिपक चहर आणि खलील अहमद या तीन राजस्थानी खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे. भारतीय संघात एकाच वेळी ३ राजस्थानी खेळाडूंना स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

याबाबत बोलताना खलील म्हणाला की मला या गोष्टीचा खूपच आनंद आहे. मला संघात स्थान देण्यात आले यामुळे मी खूपच खुश आहे. या संधीकडे मी दीर्घकालीन संधी म्हणून पाहत आहे. या संधीचे सोने करत मी माझे संघातील स्थान पक्के करण्याकडे भर देणार आहे. दीपक चहर आणि खलील अहमद यांनी याआधीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. पण फिरकीपटू राहुल चहरची ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे.

एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये निवड समितिची बैठक झाली. कर्णधार विराट कोहली हा देखील या बैठकीला उपस्थित होता. या बैठकीनंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा करण्यात आली. माजी कर्णधार एमएस धोनी विंडीज दौऱ्यात नसेल हे त्याने आधीच स्पष्ट केले होते, त्याच्या जागी ऋषभ पंत याला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांना एकदिवसीय व टी-२० संघातून विश्रांती देण्यात आली आहे.

टी-20 मालिकेसाठी संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, दिपक चहर, नवदिप सैनी