भारतीय क्रिकेट संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. तिथे संघाला तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. मात्र, तिथे पोहचलेल्या भारतीय संघाला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) पाण्याच्या वापराबाबत काही सूचना दिल्या आहेत. हरारे शहरातील पाणी टंचाईच्या समस्येमुळे बीसीसीआयला अशा सुचना देण्याची गरज भासली आहे. पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत.

बीसीसीआयने आपल्या खेळाडूंना आंघोळीसाठी कमीत कमी पाण्याचा वापर करण्याची सूचना दिली आहे. याशिवाय, त्यांचे ‘पूल सेशन’ देखील रद्द केले आहे. इनसाईडस्पोर्ट्सने बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले, “हरारेमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. खेळाडूंना त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही स्थितीत पाण्याचा अपव्यय करू नका आणि शक्य तितक्या कमी पाण्यात आंघोळ करा, असे त्यांना सांगितले आहे. पाण्याची बचत करण्यासाठी पूल सेशन रद्द करण्यात आली आहेत.”

झिम्बाब्वेतील मानवाधिकार कार्यकर्त्या लिंडा त्सुंगिराय मसारिरा यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करून पाण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. “पश्चिम हरारेसह उर्वरित राजधानीत जवळपास तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा नाही. पाणी हे जीवन आहे, त्याच्या अनुपस्थितीमुळे लोकांचे आरोग्य आणि स्वच्छतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. स्थानिक जलस्वराज्य मंत्रालय आणि हरारे प्रशासनाने लोकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे. तसेच लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी,” असे ट्वीट लिंडा यांनी केले आहे.

हेही वाचा – “आवडत्या लोकांसोबत असूनही मी…”; मानसिक आरोग्याबद्दल विराट कोहलीचा मोठा खुलासा

झिम्बाब्वेतील हरारे शहरात राहणार्‍या लोकांना आजवरच्या सर्वात भीषण पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही परिस्थिती दुष्काळामुळे नाही, तर ‘मॉर्टन जाफ्रे वॉटर ट्रीटमेंट वॉटरवर्क्स’ येथील पाणी पुरवठा प्रकल्पातील पाणी प्रक्रिया रसायने संपल्यामुळे निर्माण झाली आहे. या गोष्टीचा फटका तिथे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघालाही बसला आहे.