यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तानकडे यंदाचं या स्पर्धेचं यजमानपद देण्यात आलं आहे. परंतु भारताने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचा कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानला पाठवू शकत नाही, असं भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) मंडळानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवली जावी, असा सल्ला बीसीसीआयने दिला आहे.

एकीकडे भारताने पाकिस्तानला जाणार नसल्याची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. दुसऱ्या बाजूला भारतामुळे आशिया चषक इतरत्र खेळवावा लागला तर पाकिस्तान यंदा भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही, असा इशारा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने इशारा दिला आहे.

आशिया चषकावरून उभय देशांमध्ये संघर्ष सुरू आहे. याचदरम्यान, एका माजी पाकिस्तानी खेळाडूने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान नाझीर म्हणाला की, “भारताला पाकिस्तानात हरण्याची भीती वाटते, म्हणूनच बीसीसीआय भारतीय संघ पाकिस्तानला पाठवत नाही.”

हे ही वाचा >> विश्लेषण: ट्वेन्टी-२०मधील प्रथितयश सूर्यकुमार एकदिवसीय क्रिकेटमध्ये सपशेल अपयशी का ठरतोय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताला पाकिस्तानात पराभूत होण्याची भीती : नाझीर

नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये इम्रान नाझीर सहभागी झाला होता. त्यावेळी नाझीर म्हणाला की, “भारत पाकिस्तानला न येण्याच्या केवळ सबबी देत आहे. सुरक्षेचं कोणतंही कारण नाही. तुम्ही बघा, अलिकडच्या काळात अनेक संघ पाकिस्तानला आले. मी केवळ ‘अ’ संघांबद्दल बोलत नाहीये. ऑस्ट्रेलियाचा संघदेखील पाकिस्तानला आला होता. भारताची केवळ नाटकं आहेत. खरंतर त्यांना पाकिस्तानात पराभूत होण्याची भीती आहे. ही ढोंग सोडून त्यांनी इथे येऊन खेळलं पाहिजे. तुम्ही राजकारण करू लागलात तर त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही.”