अन्वय सावंत

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तमांपैकी एक आणि गोलंदाजांना धडकी भरवणारा अशी भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवची ओळख आहे. गेल्या वर्षी ‘आयसीसी’च्या वर्षातील सर्वोत्तम ट्वेन्टी-२० खेळाडूच्या पुरस्कारावर सूर्यकुमारने मोहोर उमटवली होती. ट्वेन्टी-२० क्रमवारीत तो अग्रस्थानावरील फलंदाज आहे. आपल्या अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या फटक्यांनी त्याने क्रिकेटरसिकांना थक्क करून सोडले. परंतु ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील अनेक विक्रमांचा मानकरी असलेल्या सूर्यकुमारला हे यश एकदिवसीय क्रिकेटमध्ये रूपांतरित करता आलेले नाही. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सपशेल अपयशी ठरतो आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यामुळे आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचे त्याचे स्वप्न अधुरेच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत काय घडले?

सर्व खेळाडू तंदुरुस्त असल्यास सूर्यकुमारला एकदिवसीय संघात अंतिम ११ जणांमध्ये स्थान मिळत नाही. परंतु पाठीच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावे लागले आणि त्याच्या जागी सूर्यकुमारला संधी मिळाली. परंतु सूर्यकुमार तीनही सामन्यांत पहिल्याच चेंडूवर खातेही न उघडता माघारी परतला. पहिल्या दोन सामन्यांत जवळपास सारख्याच चेंडूंवर डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याला पायचीत पकडले. तर तिसऱ्या सामन्यात डावखुरा फिरकीपटू ॲश्टर एगरचा चेंडू ‘बॅक फूट’वर जाऊन मारण्याच्या प्रयत्नात तो त्रिफळाचीत झाला.

हे अपयश सूर्यकुमारसाठी कितपत घातक ठरेल?

ऑस्ट्रेलिया आणि भारत हे सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल दोन स्थानांवर असणारे संघ आहेत. त्यामुळे या मालिकेत लक्षणीय कामगिरी करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात आपले स्थान जवळपास निश्चित करण्याची खेळाडूंना संधी होती. विशेषतः सूर्यकुमारसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी होती. परंतु ऑस्ट्रेलियाच्या दर्जेदार गोलंदाजांपुढे सूर्यकुमारचा निभाव लागला नाही. स्टार्कची जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम आणि सर्वांत वेगवान गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. याच वेगापुढे सूर्यकुमारच्या फलंदाजीच्या तंत्रातील मर्यादा स्पष्ट झाल्या. त्याची बॅट पूर्णपणे खाली येण्यापूर्वीच स्टार्कचा वेगवान चेंडू त्याच्या पॅडला आदळला आणि पहिल्या दोन सामन्यांत तो पायचीत झाला. एकदिवसीय विश्वचषकात केवळ अव्वल १० संघांचा सहभाग असल्याने भारताला दर्जेदार गोलंदाजांचा सामना करावा लागेल. या स्थितीत सूर्यकुमारचे सदोष तंत्र भारतासाठी अडचण ठरू शकेल.

विश्लेषण : मेहुल चोक्सीप्रमाणेच झाकीर नाईकचा भारताला शोध, नेमके आरोप काय आहेत? प्रत्यार्पण कधी होणार?

एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत कशी कामगिरी केली आहे?

सूर्यकुमारला एकदिवसीय क्रिकेटमध्ये छाप पाडता आलेली नाही. त्याने आजवर २३ एकदिवसीय सामने खेळले असून यात केवळ २४.०५च्या सरासरीने ४३३ धावा केल्या आहेत. त्याला दोनच अर्धशतके नोंदवता आली आहेत. सूर्यकुमारने एकदिवसीय कारकीर्दीची झोकात सुरुवात केली होती. पहिल्या सहाही सामन्यांमध्ये त्याला ३० धावांचा टप्पा पार करण्यात यश आले होते आणि त्याने दोन अर्धशतके साकारली होती. मात्र, त्यानंतरच्या १५ डावांमध्ये त्याला केवळ तीन वेळा २५ धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. गेल्या ११पैकी ८ डावांमध्ये तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे.

भारतीय संघ व्यवस्थापनाच्या योजनेत बदलांची आवश्यकता?

खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अधिकाधिक संधी देण्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रयत्न आहे. ‘खेळाडूमध्ये प्रतिभा असल्यास त्याला आम्ही संधी देत राहणार. आमचा त्याला पूर्ण पाठिंबा असणार,’ असे रोहितने वारंवार सांगितले आहे. केएल राहुल आणि सूर्यकुमार याची उत्तम उदाहरणे आहेत. राहुल कसोटीत आणि सूर्यकुमार एकदिवसीय क्रिकेटमध्ये अपयशी ठरत असले, तरी रोहित व द्रविड यांनी त्यांची साथ सोडलेली नाही. कर्णधार व प्रशिक्षकाच्या पाठिंब्यामुळे खेळाडूचा आत्मविश्वास वाढण्याची शक्यता असली, तरी अन्य एखाद्या खेळाडूवर हा अन्याय ठरू शकतो. केएल राहुलला कसोटी संघात स्थान मिळावे यासाठी लयीत असलेल्या शुभमन गिलला संघाबाहेर बसावे लागले होते. अखेर राहुलला सातत्याने अपयश आल्याने त्याला वगळून गिलला संधी देणे भारताला भाग पडले. मग गिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत शतक झळकावत आपली गुणवत्ता पुन्हा सिद्ध केली.

विश्लेषण : हुंडा दिला म्हणून मुलीचा वडीलांच्या संपत्तीवर अधिकार उरत नाही? उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

भारताकडे कोणत्या फलंदाजांचे पर्याय?

भारतीय संघाच्या मधल्या फळीत चौथ्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यर प्रमुख दावेदार आहे. श्रेयसने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. परंतु त्याच्या पाठीला सतत होणारी दुखापत हा भारतासाठी चिंतेचा विषय आहे. ऋषभ पंत अपघातात झालेल्या दुखापतींमधून सावरत असून त्याचे या वर्षी मैदानावर पुनरागमन अपेक्षित नाही. भारताकडे संजू सॅमसन, रजत पाटीदार आणि राहुल त्रिपाठी यांचेही पर्याय उपलब्ध आहेत. सॅमसनने ११ एकदिवसीय सामन्यांत ६६च्या सरासरीने व १०४.७६च्या धावगतीने ३३० धावा केल्या आहेत. त्याला सातत्याने संधी देण्याचा आता संघ व्यवस्थापनाने विचार करणे गरजेचे आहे. तसेच इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड हे सलामीवीर असले, तरी त्यांना मधल्या फळीत खेळण्याचा अनुभव आहे. महाराष्ट्राच्या ऋतुराजने आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेट आणि भारत-अ संघाकडून खेळताना ७२ एकदिवसीय सामन्यांत ६१च्या सरासरीने ४०३४ धावा केल्या आहेत. यात १५ शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत ऋतुराजने पाच सामन्यांत चार शतके साकारली होती. यात एका द्विशतकाचाही (१५९ चेंडूंत नाबाद २२० वि. उत्तर प्रदेश) समावेश होता. त्याने भारत-अ संघाकडून यापूर्वी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्यामुळे राष्ट्रीय संघात मधल्या फळीसाठी त्याचा विचार केला जाऊ शकतो.