वृत्तसंस्था, नागपूर : आव्हानात्मक खेळपट्टीवर रोहित शर्माने (२१२ चेंडूंत १२० धावा) कर्णधाराला साजेशी खेळी करताना साकारलेले शतक, त्याला रवींद्र जडेजा (१७० चेंडूंत नाबाद ६६) आणि अक्षर पटेल (१०२ चेंडूंत नाबाद ५२) यांनी दिलेली साथ यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर घट्ट पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारताची ७ बाद ३२१ अशी धावसंख्या होती. त्यामुळे भारताकडे १४४ धावांची आघाडी होती.

नागपूर येथील विदर्भ क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज आणि ऑस्ट्रेलियाची टॉड मर्फी व नेथन लायन ही फिरकी जोडी यांच्यातील द्वंद्व चाहत्यांना पाहायला मिळाले. मर्फीने पदार्पणातच पाच गडी बाद करण्याची किमया साधली. मात्र, त्यानंतरही भारताला मोठी आघाडी मिळवण्यात यश आले.

भारताने दुसऱ्या दिवशी १ बाद ७७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. रोहितने संयमाने फलंदाजी करताना एक बाजू लावून धरली. दुसऱ्या बाजूने मात्र ‘नाइट वॉचमन’ म्हणून फलंदाजीला आलेला रविचंद्रन अश्विन (६२ चेंडूंत २३) आणि चेतेश्वर पुजारा (१४ चेंडूंत ७) यांना ऑफ-स्पिनर मर्फीने माघारी धाडले. भोजनाच्या विश्रांतीनंतर पहिल्याच चेंडूवर मर्फीनेच विराट कोहलीला (२६ चेंडूंत १२) बाद करत भारताला अडचणीत टाकले. पदार्पणवीर सूर्यकुमार यादवही (२० चेंडूंत ८) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. लायनने त्याचा त्रिफळा उडवला. त्यामुळे भारताची ५ बाद १६८ अशी स्थिती झाली होती.

यानंतर रोहित आणि जडेजा जोडीने ६१ धावांची भागीदारी रचत भारताच्या डावाला स्थिरता मिळवून दिली. पहिल्या दिवशी आक्रमक शैलीत खेळणाऱ्या रोहितने दुसऱ्या दिवशी मात्र सामन्याच्या स्थितीनुसार खेळात बदल केला. त्याने संयमाने फलंदाजी करताना फिरकीपटूंविरुद्ध धोका पत्करणे टाळले. रोहितने ५० धावा ६६ चेंडूंतच पूर्ण केल्या होत्या. मात्र, त्यापुढील ५० धावा करण्यासाठी त्याने १०५ चेंडू घेतले. त्याने मर्फीच्या गोलंदाजीवर चौकार मारत कसोटी कारकीर्दीतील नववे शतक साकारले. रोहित आणखी मोठी खेळणार असे वाटत असतानाच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने उत्कृष्ट चेंडू टाकून त्याचा त्रिफळा उडवला. रोहितने २१२ चेंडूंत १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२० धावा करत भारताला मजबूत स्थितीत पोहोचवले.

पदार्पणवीर केएस भरतला (१० चेंडूंत ८) बाद करत मर्फीने डावातील पाचवा बळी मिळवला. मात्र, यानंतर जडेजा-अक्षर या डावखुऱ्या जोडीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. या दोघांनी ८१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. जडेजाने  १८वे कसोटी अर्धशतक करताना ९ चौकार, तर अक्षरने दुसरे अर्धशतक करताना ८ चौकार मारले.

रोहित शर्माचे कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमधील हे पहिले शतक ठरले. तसेच क्रिकेटच्या तीनही प्रकारांत शतक साकारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहितची ही खेळी खूप खास होती. नागपूरच्या या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही. मात्र, त्याने चांगली मानसिकता दाखवली. त्याची ही खेळी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती. त्याने आपल्यातील गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली.

– विक्रम राठोड, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १७७
  • भारत (पहिला डाव) : ११४ षटकांत ७ बाद ३२१ (रोहित शर्मा १२०, रवींद्र जडेजा नाबाद ६६, अक्षर पटेल नाबाद ५२; टॉड मर्फी ५/८२, पॅट कमिन्स १/७४, नेथन लायन १/९८)