पीटीआय, हैदराबाद : सूर्यकुमार यादव (३६ चेंडूंत ६९ धावा) आणि विराट कोहली (४८ चेंडूंत ६३) यांच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर भारताने तिसऱ्या आणि निर्णायक ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर सहा गडी आणि एक चेंडू राखून सरशी साधली. या विजयासह भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी फरकाने जिंकली.

हैदराबाद येथे झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेले १८७ धावांचे आव्हान भारताने १९.५ षटकांत पूर्ण केले. भारताच्या डावाची  सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर केएल राहुलला (१) डावखुरा वेगवान गोलंदाज डॅनियम सॅम्सने पहिल्याच षटकात माघारी पाठवले. तसेच गेल्या सामन्यातील भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा कर्णधार रोहित शर्माही केवळ १७ धावा करून पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यामुळे भारताची २ बाद ३० अशी स्थिती झाली होती.

सूर्यकुमार (पाच चौकार व पाच षटकार) आणि कोहली (तीन चौकार आणि चार षटकार) या जोडीने प्रतिहल्ला करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दडपण टाकले. या दोघांनी तिसऱ्या गडय़ासाठी १०४ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. सूर्यकुमार मोठा फटका मारण्याच्या नादात ६९ धावांवर बाद झाला. परंतु कोहलीला हार्दिक पंडय़ाची (१६ चेंडूंत नाबाद २५) तोलामोलाची साथ लाभली. अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता होती. कोहलीने पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर सॅम्सने त्याला माघारी पाठवले. मात्र, दोन चेंडूंत चार धावांची गरज असताना हार्दिकने चौकार मारत भारताचा विजय साकारला.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ७ बाद १८६ अशी धावसंख्या उभारली. कॅमेरुन ग्रीनने सुरुवातीपासून फटकेबाजी करताना २१ चेंडूंत सात चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने ५२ धावांची खेळी केली. अक्षर पटेलपुढे ऑस्ट्रेलियाची मधली फळी ढेपाळली. परंतु टीम डेव्हिडने २७ चेंडूंत दोन चौकार आणि चार षटकारांसह ५४ धावांची खेळी करताना ऑस्ट्रेलियाकडून पहिले अर्धशतक केले. सॅम्सने (२० चेंडूंत नाबाद २८) अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला १८० धावांपलीकडे पोहोचवले.    

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया : २० षटकांत ७ बाद १८६ (टीम डेव्हिड ५४, कॅमेरुन ग्रीन ५२; अक्षर पटेल ३/३३) पराभूत वि. भारत : १९.५ षटकांत ४ बाद १८७ (सूर्यकुमार यादव ६९, विराट कोहली ६३, हार्दिक पंडय़ा नाबाद २५; डॅनियल सॅम्स २/३३)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या सामन्यातील विजय हा भारताचा २०२२ वर्षांतील २१वा ट्वेन्टी-२० विजय ठरला. त्यामुळे एका वर्षांत सर्वाधिक ट्वेन्टी-२० सामने जिंकण्याचा विक्रम भारताने आपल्या नावे केला आहे.

  • मालिकावीर : अक्षर पटेल