scorecardresearch

भारत-इंग्लंड कसोटी मालिका : मालिका विजयाच्या आशा धूसर

जो रूट (नाबाद ७६ धावा) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ७३) यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली असून भारताच्या मालिका विजयाच्या आशा धूसर झाल्या आहेत.

भारत-इंग्लंड कसोटी मालिका : मालिका विजयाच्या आशा धूसर
( प्रतिनिधिक छायाचित्र )

भारताचे गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी; इंग्लंडला आणखी ११८ धावांची गरज

वृत्तसंस्था, बर्मिगहॅम

जो रूट (नाबाद ७६ धावा) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ७३) यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला विजयाची संधी निर्माण झाली असून भारताच्या मालिका विजयाच्या आशा धूसर झाल्या आहेत. भारताने दिलेल्या ३७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची चौथ्या दिवसअखेर ३ बाद २६० अशी धावसंख्या होती. त्यांना विजयासाठी आणखी ११८ धावांची गरज होती.

या सामन्याच्या दुसऱ्या डावात भारताचे गोलंदाज प्रभाव पाडण्यात अपयशी ठरले. इंग्लंडचे सलामीवीर अ‍ॅलेक्स लीस (५६) आणि झॅक क्रॉली (४६) यांनी १०७ धावांची भागीदारी रचली. मात्र, भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराने क्रॉली आणि ऑली पोप (०) यांना माघारी पाठवले. तर लीस धावचीत झाल्याने इंग्लंडची बिनबाद १०७ वरून ३ बाद १०९ अशी स्थिती झाली.

यानंतर मात्र रूट आणि बेअरस्टो या अनुभवी जोडीने इंग्लंडचा डाव सावरला. त्यांनी सुरुवातीपासून आक्रमक शैलीत खेळ करताना भारतीय गोलंदाजांवर दडपण टाकले. रूटने ७१, तर बेअरस्टोने ७५ चेंडूंत आपापले अर्धशतक पूर्ण केले. दिवसअखेर हे दोघेही खेळपट्टीवर होते. त्यांनी चौथ्या गडय़ासाठी १५१ धावांची भर घातली आहे.    

तत्पूर्वी, चौथ्या दिवशी ३ बाद १२५ वरून पुढे खेळणाऱ्या भारताने दुसऱ्या डावात २४५ धावांची मजल मारली. डावखुऱ्या ऋषभ पंतने ७६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने चौथ्या गडय़ासाठी चेतेश्वर पुजाराच्या साथीने ७८ धावांची भर घातली. मात्र, स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर चौकार मारण्याच्या नादात पुजारा (६६) बाद झाला. तसेच पंत (५७) जॅक लिचच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. रवींद्र जडेजाला (२३) तळाच्या फलंदाजांची साथ लाभली नाही.

संक्षिप्त धावफलक

भारत (पहिला डाव) : ४१६

इंग्लंड (पहिला डाव) : २८४

भारत (दुसरा डाव) : ८१.५ षटकांत सर्वबाद २४५ (चेतेश्वर पुजारा ६६,

ऋषभ पंत ५७; बेन स्टोक्स ४/३३)

इंग्लंड (दुसरा डाव) : ५७ षटकांत ३ बाद २६० (जो रूट नाबाद ७६, जॉनी बेअरस्टो नाबाद ७३, अ‍ॅलेक्स लीस ५६; जसप्रीत बुमरा २/५४)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India england test series hopes series victory fade amy

ताज्या बातम्या