India Test Squad Announced: आशिया चषकानंतर भारतीय संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी खेळवली जाईल. पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल. तर दुसरा सामना दिल्लीमधील अरूण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

जसप्रीत बुमराह वेस्ट इंडिजविरूद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी उपलब्ध असल्याचे त्याने बीसीसीआयला कळवलं आहे. भारतीय संघ आशिया चषकातील अंतिम फेरीत खेळला तर पहिल्या कसोटीपूर्वी संघाला फक्त ३ दिवसांची विश्रांती मिळणार आहे. त्यामुळे बुमराहची संघात निवड होणार की नाही, असा प्रश्न सर्वांना पडला होता. तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध अ संघाच्या मालिकेत मानव सुतार या भारतीय गोलंदाजाने उत्कृष्ट कामगिरी करत ५ विकेट्स घेतल्या, पण या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आलेली नाही.

वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात कोणाला मिळाली संधी?

शुबमन गिल संघाचा कर्णधार आहे, तर दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. याशिवाय इंग्लंड मालिकेत संधी मिळालेल्या करूण नायरला घरच्या मैदानावरील कसोटी मालिकेसाठी मात्र संधी मिळालेली नाही. याशिवाय इंग्लंड मालिकेत पायाला दुखापत झाल्यानंतर ऋषभ पंत अद्याप दुखापतीतून सावरला नसल्याने या मालिकेसाठी त्याची संघात निवड झालेली नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल आणि एन जगदीशन या दोघांना यष्टीरक्षक म्हणून संघात संधी दिली आहे.

अष्टपैलू खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल यांनी संधी दिली आहे. तर गोलंदाजी विभागाचं नेतृत्त्व जसप्रीत बुमराह करेल. वेगवान गोलंदाजीत बुमराहला साथ देण्यासाठी मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, नितीश कुमार रेड्डी असतील. तर कुलदीप यादव अक्षर, वॉशिंग्टन सुंदर, जडेजासह चार फिरकीपटू संघात आहेत. तर यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल हे टॉप ऑर्डरमधील फलंदाज असतील.

वेस्ट इंडिजविरूद्ध कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ

शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, एन जगदीशन, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव

भारत वि. वेस्ट इंडिज कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी – २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर – सकाळी ९.३० – अहमदाबाद
दुसरी कसोटी – १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर – सकाळी ९.३० – दिल्ली