दुबई : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवरील विजयानंतर आत्मविश्वास दुणावलेला भारतीय संघ आशिया चषक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या ‘अव्वल चार’ फेरीत आज, बुधवारी बांगलादेशचा सामना करेल. दोन्ही संघांत गुणवान फिरकीपटू असल्याने या लढतीत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर फिरकीचे वर्चस्व अपेक्षित आहे.
भारतीय संघाने यंदाच्या स्पर्धेत दबदबा राखला आहे. साखळी फेरीत भारताने ओमान, पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांना पराभूत करत दिमाखात ‘अव्वल चार’ फेरीत प्रवेश केला. या फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले. त्यामुळे भारतीय संघ सध्या भक्कम स्थितीत असून बांगलादेशवर विजय मिळवल्यास त्यांचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल.
भारत आणि बांगलादेश या संघांतील ट्वेन्टी-२० सामन्यांचा निकाल एकतर्फीच राहिला आहे. उभय संघांत एकूण १७ ट्वेन्टी-२० सामने झाले असून यात बांगलादेशला केवळ एक विजय मिळवता आला आहे. मात्र, ‘अव्वल चार’ फेरीत बांगलादेशने लयीत असलेल्या श्रीलंकेला पराभूत करण्याची किमया साधली. त्यामुळे बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक भारत निश्चितच करणार नाही.
राजकीय पातळीवरही सध्या दोन देशांतील संबंध तणावपूर्ण आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या संघाचा गेल्या महिन्यात नियोजित बांगलादेश दौराही पुढील वर्षीपर्यंत लांबणीवर टाकला. या सर्व पार्श्वभूमीवर, बांगलादेशचा संघ अधिक ईर्षेने खेळण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
वेळ : रात्री ८ वा.
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स टेन १, ३.
कुलदीप, वरुणवर भिस्त
– ‘अव्वल चार’ फेरीतील गेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताविरुद्ध दमदार सुरुवात केली होती. नऊ षटकांत पाकिस्तानने ९१ धावांची मजल मारली होती. मात्र, त्यानंतर मध्यमगती गोलंदाज शिवम दुबे आणि फिरकीपटूंनी मिळून भारताला पुनरागमन करून दिले.
– कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटाने मिळून नऊ षटके (४८ चेंडू) टाकताना ५६ धावा देत एक बळी मिळवला. दहा षटकांनंतर चेंडूचा टणकपणा कमी झाल्याने फटकेबाजी करणे सोपे नव्हते, असे पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने सांगितले होते. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही कुलदीप, वरुण आणि अक्षरची भूमिका निर्णायक ठरू शकेल.
– फलंदाजीत लयीत असलेला अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याकडून सर्वाधिक अपेक्षा असतील. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (४ षटकांत ४५ धावा) गेल्या सामन्यात महागडा ठरला. त्यामुळे आता कामगिरी उंचावण्याचा त्याचा मानस असेल.
बांगलादेशला फलंदाजीची चिंता
बांगलादेश संघाने ‘अव्वल चार’ फेरीच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा धक्का दिला होता. आता अशीच कामगिरी भारताविरुद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मात्र, त्यासाठी त्यांच्या फलंदाजांना कामगिरी उंचवावी लागेल. बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तौहिद हृदोय अव्वल, तर कर्णधार लिटन दास दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र, त्यांना अनुक्रमे १२४ आणि १२९ च्या स्ट्राइक रेटनेच धावा करता आल्या आहेत. भारतीय गोलंदाजांवर दडपण आणायचे झाल्यास बांगलादेशच्या फलंदाजांना धावांचा वेग वाढवावा लागेल. गोलंदाजी ही बांगलादेशची जमेची बाजू मानली जाते. मुस्तफिझूर रहमानच्या रूपात अखेरच्या षटकांत प्रभावी ठरू शकेल असा वेगवान गोलंदाज बांगलादेशकडे आहे. तसेच रिशाद हुसेन आणि महेदी हसन हे फिरकीपटूही बळी मिळविण्यात सक्षम आहेत. दुबई येथील खेळपट्टीचाही त्यांना फायदा मिळू शकेल.
संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, हर्षित राणा.
बांगलादेश : लिटन दास (कर्णधार/यष्टिरक्षक), तन्झिद हसन, परवेझ हुसेन इमॉन, सैफ हसन, तौहिद हृदोय, जाकेर अली, शमीम हुसेन, नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिझूर रहमान, तन्झिम हसन, तस्किन अहमद, शोरिफूल इस्लाम, मोहम्मद सैफुद्दीन.