कॅनबेरा : जगज्जेता भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया हे जागतिक ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारीतील अव्वल दोन संघ आता समोरासमोर येणार असून पाच सामन्यांच्या मालिकेत चाहत्यांना आक्रमक फलंदाजीची पर्वणी अनुभवायला मिळणे अपेक्षित आहे. या ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना आज, बुधवारी ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथे खेळवला जाईल.
पुढील वर्षीच्या सुरुवातीला भारतात ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय संघाने अलीकडेच आशिया चषक स्पर्धा जिंकून आपली लय दाखवून दिली आहे. गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर भारतीय संघाने या प्रारूपात २७ सामने खेळले असून त्यापैकी तब्बल २२ मध्ये विजय नोंदवला आहे.
दुसरीकडे, याच कालावधीत ऑस्ट्रेलियाने १९ पैकी १६ ट्वेन्टी-२० सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. दोन्ही संघांत प्रतिभावान युवा खेळाडू आणि गुणवान अनुभवी खेळाडूंचे योग्य मिश्रण आहे. त्यामुळे ही ट्वेन्टी-२० मालिका अत्यंत चुरशीची होणे अपेक्षित आहे.
सलामीवीरांकडे लक्ष
भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आक्रमक शैलीतील फलंदाजीला पसंती देत आहेत. अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड हे ‘आयपीएल’मध्ये सनरायजर्स हैदराबादसाठी एकत्रित खेळणारे सलामीवीर आता आपापल्या राष्ट्रीय संघांचे प्रतिनिधित्व करतील. या दोघांचाही पहिल्या चेंडूपासून धोका पत्करण्यात आणि गोलंदाजांवर हल्ला चढवण्यात हातखंडा आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.
भारतासाठी अभिषेकच्या साथीने शुभमन गिल, तर ऑस्ट्रेलियासाठी हेडच्या साथीने कर्णधार मिचेल मार्श सलामीला उतरेल. या जोड्यांवरच आपापल्या संघाला आक्रमक सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी असेल. तसेच कॅनबेरा येथील मनुका ओव्हलच्या खेळपट्टीवर चेंडूला अतिरिक्त उसळी मिळते. अशात दोन्ही संघांच्या गोलंदाजांचीही भूमिका महत्त्वाची ठरेल.
वेळ : दुपारी १.४५ वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.
सूर्यकुमारला लय सापडणार?
– सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने गेल्या वर्षभरात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, फलंदाज म्हणून सूर्यकुमारला फारसे यश मिळू शकलेले नाही. तो यावर्षी खेळलेल्या १२ आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांत मिळून केवळ १०० धावा करू शकला आहे. यात त्याची सरासरी ११.११ अशी, तर स्ट्राइक रेट १०५.२६ असा आहे.
– सूर्यकुमार फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्यांवर विशेष अडचणीत सापडतो. मात्र, ऑस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांवर चेंडूला अतिरिक्त उसळी मिळते. अशा खेळपट्ट्यांवर त्याला मागील दिशेला फटके मारणे अधिक सोपे जाईल. त्यामुळे या मालिकेत त्याच्याकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.
– आशिया चषकात भारतीय संघ वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या फिरकी त्रिकुटासह खेळला होता. आता ऑस्ट्रेलियातही हे तिघे एकत्रित खेळण्याचे संकेत सूर्यकुमारने दिले आहेत. मात्र, जायबंदी हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराच्या साथीने वेगवान गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारताकडे अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांचा पर्याय उपलब्ध आहे.
संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रिंकू सिंह, नितीश रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा. ऑस्ट्रेलिया : मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), जोश फिलिपे (यष्टिरक्षक), टीम डेव्हिड, मार्कस स्टोइनिस, मिचेल ओवेन, शॉन ॲबट, झेवियर बार्टलेट, नेथन एलिस, जोश हेझलवूड, मॅथ्यू कुनमन, तन्वीर संघा.
