IND vs AUS 2nd ODI Pitc Report And Weather Report: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघ मालिकेत ०- १ने पिछाडीवर आहे. मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबरला ॲडलेडच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिका १-१ ने बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही पाऊस खोडा घालणार का? खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या.
खेळपट्टी कोणाला साथ देणार?
मालिकेतील दुसरा सामना ॲडलेड ओव्हलच्या मैदानावर रंगणार आहे. ही खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांसाठीही फायदेशीर ठरते. याआधी झालेल्या सामन्यात ओव्हलच्या खेळपट्टीवर फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे फलंदाज धावांचा पाऊस पाडताना दिसू शकतात. यासह या खेळपटीवर फिरकी गोलंदाजांना चांगला स्पिन आणि बाऊन्स मिळतो. त्यामुळे भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये कुलदीप यादवचा समावेश पाहायला मिळू शकतो.
हवामान कसं असेल?
ॲक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार, २३ ऑक्टोबरला ॲडलेडमध्ये आभाळ मोकळं असेल. त्यामुळे पाऊस पडण्याची कुठलीही शक्यता नाही. तसेच तापमान ११ ते २० डिग्री सेल्सिअस इतकं असेल असा अंदाज आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ५०-५० षटकांचा सामना पाहायल मिळू शकतो. याआधी झालेल्या पर्थ वनडेत ४ वेळा पावसामुळे सामना थांबला होता. याचा भारतीय संघाला चांगलाच फटका बसला. पण या सामन्यात असं काही होण्याची शक्यता खूप कमी आहे.
ॲडलेडमध्ये कसा आहे भारतीय संघाचा रेकॉर्ड?
भारतीय संघाने या मैदानावर खेळताना वनडे क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. भारताने या मैदानावर १५ वनडे सामने खेळले आहेत. यापैकी ९ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि १ सामना अनिर्णित राहिला आहे. २०१५ वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना भारताने याच मैदानावर पाकिस्तानचा पराभव केला होता. भारतीय संघाने या सामन्यात ३०० धावांचा डोंगर उभारला होता. पाठलाग करण्यासाठी आलेला पाकिस्तानचा डाव अवघ्या २२४ धावांवर आटोपला होता.