India vs Australia 3rd T20 Hobart : भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष संघांतील तिसरा ट्वेन्टी-२० क्रिकेट सामना आज, रविवारी होबार्ट येथे रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाचा तारांकित वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड याला मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आल्याने भारतीय फलंदाजांना कामगिरी उंचावणे काहीसे सोपे जाऊ शकेल. तसेच पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाबाहेर बसविण्यात आलेल्या वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी मिळणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात हेझलवूडच्या भेदक माऱ्यासमोर भारताची आघाडीची फळी ढेपाळली होती. हेझलवूडने शुभमन गिल, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला. यानंतर अभिषेक शर्माने झुंजार अर्धशतक साकारले, पण त्याला हर्षित राणा वगळता इतरांची साथ न लाभल्याने भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-१ असा पिछाडीवर आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

‘‘उर्वरित मालिकेसाठी हेझलवूड ऑस्ट्रेलियन संघात नसणे हा आमच्यासाठी मोठा दिलासा आहे. मी यापूर्वी त्याच्याविरुद्ध खेळलो नव्हतो. तो फारच गुणवान गोलंदाज आहे,’’ असे दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर अभिषेक शर्मा म्हणाला होता. हेझलवूडने अतिरिक्त उसळी असणाऱ्या खेळपट्टीवर आखूड टप्प्यावर चेंडू टाकत भारतीय फलंदाजांची कसोटी पाहिली होती. झेवियर बार्टलेट, नेथन एलिस आणि शॉन ॲबट यांसारखे गोलंदाजही प्रभावी कामगिरी करण्यात सक्षम असले, तरी त्यांच्याकडे हेझलवूडप्रमाणे चेंडू स्विंग करण्याची क्षमता नाही. याचा भारतीय फलंदाजांना फायदा मिळू शकेल.

दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात गिलला सूर गवसला नाही. हेझलवूडविरुद्धच तो वारंवार अडचणीत सापडला होता. गिलला गेल्या १२ ट्वेन्टी-२० सामन्यांत अर्धशतक साकारता आलेले नाही. त्यामुळे आता कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न असेल. होबार्टचे बेलरिव्ह ओव्हल अन्य ऑस्ट्रेलियन मैदानांच्या तुलनेत छोटे असून सीमारेषाही जवळ आहे. त्यामुळे या लढतीत मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकेल.

वेळ : दुपारी १.४५ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस २, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप.