नॉटिंगहॅममध्ये सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव २७८ धावांवर आटोपला आहे. त्यानंतर रोरी बर्न्स आणि डॉमिनिक सिब्ले या दोन्ही सलामीवीरांनी इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात केली आहे. ११.१ षटके खेळल्यानंतर पावसाने खेळात व्यत्यत आणला. त्यानंतर पंचांनी तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले. बर्न्स ११ तर सिब्ले ९ धावांवर नाबाद आहे. भारताच्या पहिल्या डावात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा हे स्टार फलंदाज अपयशी ठरल्यानंतर  सलामीवीर लोकेश राहुल आणि मधल्या फळीत रवींद्र जडेजा यांनी सावरले. या दोघांनी जोडलेल्या महत्त्वपूर्ण धावांमुळे भारताला पावणेतीनशेचा टप्पा ओलांडता आला. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने ५ आणि अँडरसनने ४ बळी घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा पहिला डाव

इंग्लंडला १८३ धावांवर गुंडाळल्यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी ९७ धावांची दमदार सलामी दिली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनने रोहितला वैयक्तिक ३६ धावांवर माघारी धाडत संघाला पहिले यश मिळवून दिले. रोहित माघारी परतल्यानंतर संघाचे आधारस्तंभ विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे झटपट बाद झाले. विशेष म्हणजे विराट शून्यावर माघारी परतला. इंग्लंडचा तेजतर्रार गोलंदाज जेम्स अँडरसनने आपली जादू कायम राखत विराटला पहिल्याच चेंडूवर बाद केले. अँडरसनने टाकलेला अप्रतिम चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात विसावला. चेतेश्वर पुजारालाही अँडरसननेच बाद केले. त्याने ४ धावा केल्या. तर चोरटी धाव घेण्याच्या नादात अजिंक्य रहाणे ५ धावांवर तंबूत परतला. पहिल्या दिवसअखेर नाबाद असणारा ऋषभ पंत दुसऱ्या दिवशी लवकर बाद झाला.

 

त्यानंतर एका बाजूला स्थिरावलेल्या राहुलने रवींद्र जडेजाला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी उभारली. उपाहारानंतर लोकेश राहुल शतक साकारेल, असे सर्वांना वाटत होते. पण इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. राहुलने २१२ चेंडूत १२ चौकारांसह ८४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. राहुल माघारी परतल्यानंतर शार्दुल ठाकूरलाही अँडरसनने शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर रवींद्र जडेजाने आपले अर्धशतक फलकावर लावले. जडेजा ५६ धावांवर असताना रॉबिन्सनने त्याला ब्रॉडकरवी झेलबाद केले. जडेजाने ८ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी खेळी केली. त्यानंतर जसप्रीत बुमराहने आक्रमक फटकेबाजी करत २८ धावा जोडल्या. रॉबिन्सनने त्याला बाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला. त्याने ८५ धावांत ५ तर अँडरसनने ५४ धावांत ४ बळी घेतले.

हेही वाचा – Tokyo 2020 : सेमीफायनलच्या झुंजीत कुस्तीपटू बजरंग पुनिया पराभूत, ब्राँझची आशा कायम

इंग्लंडचा पहिला डाव

पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला थक्क केले. इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी या भारताच्या वेगवान गोलंदाजांसमोर इंग्लंडचा संघ १८३ धावांत सर्वबाद झाला. जो रूटने ११ चौकारांसह ६४ धावांची खेळी केली. जसप्रीत बुमराहने जेम्स अँडरसनची दांडी गुल करत इंग्लंडचा डाव संपवला. त्याने ४६ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद शमीला ३ आणि शार्दुल ठाकूरला २ बळी घेता आले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england 2021 first test third day report adn
First published on: 06-08-2021 at 15:41 IST