India vs England 3rd Test: लॉर्डसच्या मैदानावर पार पडलेला तिसरा कसोटी सामना क्रिकेट चाहते कधीच विसरू शकणार नाहीत. इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी १९३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना भारताच्या प्रमुख फलंदाजांनी नांग्या टाकल्या. पण भारताच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी मिळून पूर्ण जोर लावला. रवींद्र जडेजा शेवटपर्यंत उभा राहिला. पण भारताला हा सामना २२ धावांनी गमवावा लागला आहे. भारताचा दुसरा डाव १७० धावांवर आटोपला.
इंग्लंडने दिलं १९३ धावांचं आव्हान
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडने ३८७ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने देखील १६२ धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेला इंग्लंडचा डाव १९२ धावांवर आटोपला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जॅक क्रॉलीने २२, बेन डकेटने १२, ओली पोपने ४, जो रूटने ४०, हॅरी ब्रुकने २३, कर्णधार बेन स्टोक्सने ३३, जेमी स्मिथने ८, ख्रिस वोक्सने १० धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. नितीश कुमार रेड्डी आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.
भारतीय संघाचा दुसरा डाव
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलकची जोडी मैदानावर आली. या डावात भारताला अपेक्षित सुरूवात करता आली नाही. यशस्वीने जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर नको तो फटका मारला आणि आपली विकेट फेकली. तो शुन्यावर माघारी परतला. जैस्वाल बाद झाल्यानंतर, करूण नायर आणि केएल राहुलने मिळून काही महत्वपूर्ण धावा जोडल्या. पण करूण नायरला १४ धावांवर पायचित होऊन माघारी परतावं लागलं. कर्णधार शुबमन गिलही या डावात स्वस्तात माघारी परतला. नाईट वॉचमन म्हणून आलेला आकाश दीप १ धाव करत माघारी परतला.
पाचव्या दिवशी काय घडलं?
पाचव्या दिवशी जोफ्रा आर्चरच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. सर्वात आधी ऋषभ पंत ९ धावांवर त्रिफळाचित होऊन माघारी परतला. त्यानंतर केएल राहुलही ३९ धावांवर माघारी परतला. वॉशिंग्टन सुंदरला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर जडेजाने नितीश कुमार रेड्डीसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. शेवटी जडेजाने जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसोबत मिळून डाव सांभाळला. शेवटी सिराजची विकेट पडल्यामुळे भारताचा संघ विजयापासून २२ धावा दूर राहिला.