India vs England 4th Test, Live Updates: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवशी फलंदाजी करताना भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. पहिल्या दिवसाअखेर भारताला ४ गडी बाद २६४ धावा करता आल्या आहेत. दरम्यान भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.
पहिल्या दिवशी काय घडलं?
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून केएल राहुल आणि यशस्वी जैस्वालची जोडी मैदानावर आली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९४ धावा जोडल्या. केएल राहुल ४६ धावांवर तंबूत परतला. तर जैस्वालने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने ५८ धावांची खेळी केली. कर्णधार शुबमन गिल १२ धावांवर बाद झाला. साई सुदर्शनने ६१ धावा केल्या. तर रवींद्र जडेजा १९ आणि शार्दुल ठाकूर १९ धावांवर नाबाद परतले. भारतीय संघाची चिंता वाढवणारी बातमी म्हणजे ऋषभ पंत दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे पुढील ६ आठवडे त्याला विश्रांती करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकणार नाही.
ऋषभ पंत फलंदाजीला येणार?
पहिल्या दिवशी फलंदाजी करत असताना ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतावं लागलं होतं. आता त्याच्या खेळण्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. ऋषभ पंत ड्रेसिंग रुममध्ये परतला आहे. तो यष्टीरक्षण करू शकणार नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करताना दिसेल. तर संघाला गरज भासल्यास तो फलंदाजीसाठी उपलब्ध असेल
ऋषभ पंतचं अर्धशतक पूर्ण
सामन्यातील पहिल्या दिवशी ऋषभ पंतच्या पायाला दुखापत झाली होती. तो मैदानावर येण्याची शक्यता खूप कमी होती. पण तरीदेखील तो फलंदाजीला आला आणि ७० चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
भारतीय संघाचा पहिला डाव
भारतीय संघाचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपला आहे. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जैस्वालने ५८, केएल राहुलने ४६, साई सुदर्शनने ६१, शुबमन गिलने १२, ऋषभ पंतने ५४, रवींद्र जडेजाने २०, शार्दुल ठाकूरने ४१, वॉशिंग्टन सुंदने २७, अंशुल कंबोज ०, जसप्रीत बुमराहने ४ आणि मोहम्मद सिराजने नाबाद ५ धावांची खेळी केली.
इंग्लंडची दमदार सुरूवात
भारतीय संघाचा पहिला डाव ३५८ धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडची सलामी जोडी मैदानात आली. बेन डकेट आणि जॅक क्रॉली या जोडीने भारतीय संघाला दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १६६ धावा जोडल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने ८४ धावांची खेळी केली. त्याला जडेजाने झेलबाद करत माघारी धाडलं. तर बेन डकेटने ९४ धावांची खेळी केली. त्याला अंशुल कंबोजने बाद करत आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिली विकेट मिळवली. दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने २ गडी बाद २२५ धावा केल्या आहेत.