चौथी कसोटी आजपासून; मालिका जिंकण्यासाठी भारताचा पक्का गृहपाठ

स्थळ : वानखेडे स्टेडियम.. मार्च २००६ : इंग्लंडचा २१२ धावांनी शानदार विजय.. नोव्हेंबर २०१२ : इंग्लंडचा दहा विकेट्स राखून दणदणीत विजय.. डिसेंबर २०१६ : कोण जिंकणार?

वानखेडे स्टेडियमचा गेल्या दहा वर्षांचा इतिहास इंग्लिश संघाला साथ देतो. चार वर्षांपूर्वी केव्हिन पीटरसनने उभारलेली शतकी खेळी ही भारतीय भूमीवर परदेशी फलंदाजाने साकारलेली एक संस्मरणीय खेळी ठरली आहे. याशिवाय २०११ (इंग्लंड), २०१२ (भारत) आणि २०१४ (इंग्लंड) या मागील तिन्ही मालिकांवर इंग्लंडचेच प्रभुत्व होते. त्यामुळेच इंग्लंडचा कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक वानखेडेच्या बालेकिल्ल्यावर आशावादी आहे.

पहिली कसोटी (राजकोट) : अनिर्णित.. दुसरी कसोटी (विशाखापट्टणम्) : भारताचा २४६ धावांनी विजय.. तिसरी कसोटी (मोहाली) : भारताचा ८ विकेट्स राखून विजय.. ही आहे भारताची इंग्लंडविरुद्धच्या ताज्या मालिकेतील कामगिरी. त्यामुळेच वानखेडेवर इंग्लिशचा पेपर कठीण असला तरी चौथ्या कसोटीसह मालिकेवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी भारताने चांगला गृहपाठ केला आहे. हा सामना भारताने बरोबरीत जरी सोडवला तरी इंग्लिश संघ मालिका गमावणार आहे.

’  रहाणे, शमीची माघार

दुखापती या खेळाडूच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतात. नवे खेळाडू दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संघात स्थान मिळवतात आणि आपले योगदान देतात, असे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी सांगितले होते. परंतु चौथ्या कसोटीच्या पूर्वसंध्येला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणे यांनी दुखापतींमुळे माघार घेतल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे रहाणे मालिकेतील उर्वरित दोन्ही कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी मनीष पांडेचा संघात समावेश करण्यात आला आहे. याचप्रमाणे गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे शमीने माघार घेतली आहे. त्याची जागा मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर घेणार आहे.

सलामीवीर लोकेश राहुल दुखापतीतून सावरला असून, तो पुन्हा आपली जागा घेईल, असे कोहलीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोहाली कसोटीत पर्दापण करणारा करुण नायर संघाबाहेर जाईल. आठ वर्षांच्या अंतराने भारतीय संघात परतलेल्या पार्थिव पटेलने यष्टीरक्षणासोबतच सलामीला उतरून अनुक्रमे ४२ आणि ६७ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या अव्वल दर्जाच्या वेगवान माऱ्याचा त्याने हिमतीने मुकाबला केला होता. त्यामुळेच त्याला मुंबईच्या सामन्यात कायम ठेवण्यात आले आहे. मात्र राहुल परतल्यामुळे पार्थिव मधल्या फळीत फलंदाजी करील.

’  विजयच्या फॉर्मची चिंता

चेतेश्वर पुजारा व कोहली यांच्या धावांच्या सातत्यावर भारताची फलंदाजी अवलंबून आहे. त्याला मोलाची साथ मिळते आहे, ती तळाच्या फलंदाजांकडून. परंतु सलामीवीर मुरली विजय धावांसाठी झगडताना आढळत आहेत, हीच भारताची प्रमुख चिंता आहे. विजयने राजकोट कसोटीत शतक झळकावले होते. आखूड टप्प्याचे चेंडू ही विजयची कमजोरी ठरत आहे.

भारताच्या गोलंदाजीच्या माऱ्यात माफक बदल होणार आहेत. ठाकूर आणि उमेश यादव नवा चेंडू हाताळतील. रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि जयंत यादव हे त्रिकूट फिरकीची धुरा वाहतील.

’  जेनिंग्स, डॉसनचे पदार्पण नक्की

इंग्लंडच्या संघाने दोन दुखापतग्रस्त खेळाडूंऐवजी दोन पदार्पणासाठी उत्सुक खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. जन्माने आशियाई असलेले सलामीवीर हसीब हमीद आणि डावखुरा फिरकी गोलंदाज झफर अन्सारी यांच्या जागी किटॉन जेनिंग्स आणि लिआम डॉसन यांना संघात स्थान देण्यात आले आहे. हमीदच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे जेनिंग्स कुकसोबत सलामीला उतरणार आहे. दुखापतीतून सावरून वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड संघात परततोय, ही इंग्लंडसाठी सुखद गोष्ट  आहे.

इंग्लंडच्या फलंदाजीची मदार कुक व जो रूटच्या समर्थ खांद्यावर असेल. वानखेडेवर २०१२मध्ये इंग्लंडने मिळवलेल्या विजयात कुकच्या खेळीचाही सिंहाचा वाटा होता. भारतीय भूमीवर फिरकीचे वर्चस्व पाहता इंग्लंडला दोन फिरकी गोलंदाजांना संघात स्थान द्यावे लागणार आहे.

संघ

  • ’ भारत : विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, मनीष पांडे, रवीचंद्रन अश्विन, पार्थिव पटेल (यष्टीरक्षक), रवींद्र  जडेजा, अमित मिश्रा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, करुण नायर, जयंत यादव, भुवनेश्वर कुमार.
  • ’ इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), किटॉन जेनिंग्स, मोईन अली, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जेकी बॉल, गॅरी बॅलन्स, गॅरेथ बॅटी, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, बेन डकेट, स्टीव्हन फिन, लिआम डॉसन, आदिल रशीद, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स.
  • ’ सामन्याची वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून.
  • ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३.

 

  • वानखेडे स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यात आतापर्यंत सात सामने झाले असून, दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन सामने जिंकले आहेत, तर एक सामना अनिर्णीत राहिला होता.
  • भारतीय संघ वानखेडेवर आतापर्यंत २४ सामने खेळला आहे. यापैकी १० सामने भारताने जिंकले आहेत. ७ सामने भारत हरला असून, यापैकी ३ पराभव हे इंग्लंडविरुद्ध पत्करलेले आहेत, तर ३ सामने अनिर्णीत राखले आहेत.
  • कसोटी क्रिकेटमध्ये अपराजित राहण्याच्या विक्रमापासून (१७ सामने) भारतीय संघ फक्त एका सामन्याच्या अंतरावर आहे. १९८५ ते १९८७ या कालखंडात भारताने कपिलदेव यांच्या नेतृत्वाखाली हा पराक्रम दाखवला होता.