Ravindra Jadeja Six: लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी १९३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला चांगली सुरूवात करता आलेली नाही. भारताचे ८ फलंदाज तंबूत परतले आहेत. पण जडेजा आणि बुमराह खंबीरपणे उभा राहिला. यादरम्यान रवींद्र जडेजाने ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीवर स्टेप आऊट होऊन खणखणीत षटकार मारला.
या सामन्यातील पाचव्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला आला, त्यावेळी भारतीय संघाची धावसंख्या ४ गडी बाद ५८ इतकी होती. त्यामुळे भारतीय संघावर दबाव होता. ऋषभ पंत आणि केएल राहुलची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. पण भारताला पहिल्याच सत्रात मोठा धक्का बसला. ऋषभ पंत त्रिफळाचित होऊन माघारी परतला. पंत पाठोपाठ राहुल आणि वॉशिंग्टन सुंदरही स्वस्तात बाद होऊन माघारी परतले. भारताचे ७ फलंदाज तंबूत होते. त्यावेळी रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डीने मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी पहिल्या सत्राच्या शेवटपर्यंत किल्ला लढवला. पण लंचच्या आधी नितीश कुमार रेड्डीने विकेट फेकली. यासह भारताला आठवा धक्का बसला.
जडेजाचा दमदार षटकार
भारताचे ८ फलंदाज बाद होऊन माघारी परतल्यानंतर, जडेजाने बुमराहसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान ख्रिस वोक्सने त्याला जवळजवळ बाद केलं होतं. तर झाले असे की, इंग्लंडकडून ४८ वे षटक टाकण्यासाठी ख्रिस वोक्स गोलंदाजीला आला. या षटकातील चौथा चेंडू हा जडेजाच्या पॅडला जाऊन लागला. ख्रिस वोक्सने पंचांकडे जोरदार अपील केली. पंचांनी वेळ न दवडता आपलं बोट उचललं. जडेजानेही वेळ न दवडता डीआरएसची मागणी केली. डीआरएसमध्ये इम्पॅक्ट हा ऑफ स्टंपच्या बाहेर असल्याचं दिसून आलं. त्यामुळे तो नाबाद राहिला.
जडेजाला जीवदान मिळाल्यनंतर पुढच्याच चेंडूवर त्याने स्टेपआऊट होऊन मिडविकेटच्या वरून खणखणीत षटकार मारला. या षटकारानंतर त्याने आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण हा प्रयत्न थोडक्यात फसला. पण, जडेजाने मारलेल्या षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय संघ अडचणीत
भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावा करायच्या आहेत. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. चौथ्या दिवसाच्या शेवटी यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर करूण नायर १४ धावांवर माघारी परतला. कर्णधार शुबमन गिल या डावात स्वस्तात माघारी परतला. त्याला अवघ्या ६ धावा करता आल्या. आकाशदीप १ धाव करत माघारी परतला. त्यानंतर पाचव्या दिवशी ऋषभ पंत ९, केएल राहुल ३९, वॉशिंग्टन सुंदर ० आणि नितीश कुमार रेड्डी १३ धावा करत माघारी परतला.