IND vs NZ 2nd T20 : हिटमॅन आर्मीनं मालिका टाकली खिशात; दुसरा टी-२० सामनाही जिंकला!

रांचीच्या मैदानावर भारतानं न्यूझीलंडला ७ गडी राखून मात दिली आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.

india vs new zealand second t20 match report
भारताची न्यूझीलंडवर मात

रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारताने न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा टी-२० सामना जिंकत तीन सामन्यांची मालिका खिशात टाकली आहे. रांचीमध्ये रंगलेल्या या सामन्यात रोहितने पुन्हा टॉस जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दमदार सुरुवात केलेल्या न्यूझीलंडचा संघ शेवटच्या षटकात धावा जमवण्यात अपयशी ठरला. २० षटकात न्यूझीलंडने ६ बाद १५३ धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने २५ धावांत २ बळी घेत उत्तम पदार्पण केले. शेवटच्या ३ षटकात न्यूझीलंडला १५ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकली. त्यांनी केलेल्या ११७ धावांच्या भागीदारीमुळे भारताला १७.२ षटकातच ७ गडी राखून हा विजय मिळाला. हर्षलला सामनावीर पुरस्कार मिळाला. तिसरा आणि अंतिम सामना २१ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथे होणार आहे.

भारताचा डाव

रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी आपला जलवा कायम राखत सलग पाचवी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली. आज दोघांनी आक्रमक पवित्रा घेतला. १४व्या षटकात न्यूझीलंडचा कप्तान टिम साऊदीने राहुलला बाद करत ही भागीदारी मोडली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. या दोघांनी ११७ धावा रचल्या. राहुलनंतर साऊदीने रोहितला माघारी धाडले. राहुलने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६५ तर रोहितने १ चौकार आणि ५ षटकारांसह ५५ धावा केल्या. १८व्या षटकात डावखुरा फलंदाज ऋषभ पंतने नीशमला षटकार खेचत विजयावर शिक्कामोर्तब केले.

न्यूझीलंडचा डाव

न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलने भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकत उत्तम सुरुवात केली. त्याने आक्रमक तक डॅरिल मिशेलने सावध पवित्रा अवलंबला. या दोघांनी ४८ धावांची सलामी दिली. वेगवान गोलंदाज दीपक चहरने गप्टिलला झेलबाद केले. गप्टिलने १५ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावा केल्या. त्यानंतर मिशेलने मार्क चॅपमनसह संघाला सावरले. चॅपमन अक्षरचा बळी ठरला. तर पदार्पणवीर हर्षल पटेलने मिशेलच्या (३१) रुपात आपला पहिला बळी घेतला. ग्लेन फिलिप्सच्या ३४ धावांमुळे न्यूझीलंडला दीडशेपार जाता आले. शेवटच्या पाच षटकात भारताने किफायतशीर गोलंदाजी केली आणि न्यूझीलंडला २० षटकात ६ बाद १५३ धावांवर रोखले. भारताचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने हर्षल पटेलला पदार्पणाची कॅप दिली. हर्षल हा आयपीएलच्या शेवटच्या हंगामात पर्पल कॅप मिळवणारा गोलंदाज आहे.

हेही वाचा – End Of An ERA..! डिव्हिलियर्समधून क्रिकेट निवृत्त; भावूक नेटकरी म्हणाले, “आम्ही तुला…”

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), व्यंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल.

न्यूझीलंड : मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट ( यष्टिरक्षक ), जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साऊदी (कर्णधार), अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs new zealand second t20 match report adn

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या