आशिया चषक २०२५ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघ १-१ सामना खेळून आले आहेत. या दोन्ही संघांनी आपल्या पहिल्या सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. भारतीय संघाने पहिल्या लढतीत यूएईचा ९ गडी राखून पराभव केला. तर पाकिस्तानने ओमानविरुद्ध झालेल्या सामन्यात ९३ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या सामन्यावेळी हवामान कसं असेल? जाणून घ्या.
खेळाडूंना या अडचणीचा सामना करावा लागणार
हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये रंगणार आहे. त्यामुळे पावसाची शक्यता तर फारच कमी आहे. पण खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. ॲक्यूवेदरच्या रिपोर्टनुसार, तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल. त्यामुळे खेळाडूंना उष्ण वातावरणाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे खेळाडूंना थकवा येऊ शकतो. आता खेळाडू स्वतःला फिट कसं ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
खेळपट्टी कशी असेल?
दुबईतील खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर, इथे फलंदाजी करणं थोडं कठीण असतं. सामन्यातील सुरुवातीच्या काही षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते. वेगवान गोलंदाजांना गती आणि चेंडूला उसळी मिळते. पण सामना जसजसा पुढे जाईल, फलंदाजी करणं सोपं होईल. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना देखील मदत मिळते. त्यामुळे भारतीय संघ फिरकी गोलंदाजांना खेळवण्यावर अधिक भर देऊ शकतो.
या खेळपट्टीवर सरासरी धावसंख्या १३५ ते १४० पर्यंत आहे. या मैदानावर पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत ५२ सामने जिंकले आहेत. तर ५९ सामने हे धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरूण चक्रवर्ती