तिसऱ्या आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेनं ७ गडी राखून जिंकला. भारतानं दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेनं ३ गडी गमवून पूर्ण केलं. या विजयासह दक्षिण अफ्रिकेनं ही मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचं दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या. भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचं आव्हान ठेवलं होतं.
दक्षिण आफ्रिकेचा डाव
एडन मारक्रमनं २२ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर डीन एल्गार आणि किगन पीटरसननं मोर्चा सांभाळला. मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर डीन ३० धावा करून तंबूत परतला. किगन आणि दुस्सेननं तिसऱ्या गड्यासाठी मोठी भागीदारी केली. मात्र किगन ८२ धावांवर असताना शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रस्सी वॅन दर दुस्सेन आमि टेम्बा बवुमा या जोडीनं विजय मिळवून दिला. रस्सी वॅन दर दुस्सेन याने नाबाद ४१ आणि टेम्बा बवुमा नाबाद ३२ धावा केल्या.
भारताचा दुसरा डाव
भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज जानसेनने त्याला १० धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. तर मयंक अग्रवाल (७) धावांवर कगिसो रबाडाचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी संघाला अर्धशतक गाठून दिले. त्यानंतर जानसेनने पुजाराला जास्त वेळ टिकून दिले नाही. त्याने पुजाराला वैयक्तिक ९ धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. परंतु तो सुद्धा पुन्हा अपयशी ठरला. रबाडाने रहाणेला (१) बाद केले. रहाणेनंतर विराटची साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात आला. त्याने कोणताही दबाव न घेता मुक्तपणे फलंदाजी केली. विराट संयमी तर पंत आक्रमक खेळला. जानसेनला फटका खेळत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे पहिले अर्धशतक फलकावर लावले. शतकी भागीदारीला काही धावा शिल्लक असताना एनगिडीने विराटला तंबूचा मार्ग दाखवला. विराटने २९ धावांचे योगदान दिले. १५२ धावांवर भारताचे ५ गडी तंबूत परतले. त्यानंतर ऋषभ पंतने किल्ला लढवला. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना त्याने संघाची आघाडी दोनशेपार पोहोचवली. अश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांना आफ्रिकेच्या गोलंदाजांनी लवकर तंबूत धाडले. ९ गडी बाद झाले असताना ऋषभने आपले शतक पूर्ण केले. जानसेनने जसप्रीत बुमराहला झेलबाद करत भारताचा डाव ६७.३ षटकात १९८ धावांवर संपुष्टात आणला. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचे आव्हान दिले. पंतने ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली. तर आफ्रिकेकडून जानसेनने सर्वाधिक ४ बळी घेतले. रबाडा आणि एनगिडी यांना प्रत्येकी ३ बळी मिळाले.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला (३) लवकर तंबूत पाठवत भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या दिवसअखेर एडन मार्कराम आणि नाईट वॉचमन केशव महाराज नाबाद होते. दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच बुमराहने सुरेख पद्धतीने मार्करामचा (८) त्रिफळा उडवला. संघाचा अर्धशतकी पल्ला गाठण्यापूर्वी केशव महाराजही (२५) उमेश यादवच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर कीगन पीटरसन आणि रुसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाला सावरलं. या दोघांनी संयमी भागीदारी रचत संघाचे शतक फलकावर लावले. उमेश यादवने ड्यूसेनला (२१) बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या टेंबा बावुमाने पीटरसनला थोडी साथ दिली. पीटरसनने आपले अर्धशतक पूर्ण करत एका बाजूला किल्ला लढवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आधी बावुमाला आणि त्यानंतर काइल वेरेनला बाद करत आफ्रिकेला अजून संकटात टाकले. १५९ धावावर यजमानांनी ६ फलंदाज गमावले. तर बुमराहने जानसेनची दांडी गूल करत आफ्रिकेला सातवा धक्का दिला. बुमराहने ड्यूसेनला पुजारावकरवी झेलबाद करत आफ्रिकेची आशा संपुष्टात आणली. ड्युसेनने ९ चौकारांसह ७२ धावांची खेळी केली. त्यानंतर बुमराहने एनगिडीला बाद करत दक्षिण आफ्रिकेचा डाव ७६.४ षटकात २१० धावांवर संपुष्टात आणला. बुमराहने ४२ धावांत ५ बळी घेतले. तर शमी आणि उमेश यादवला प्रत्येकी २ बळी मिळाले.
भारताचा पहिला डाव
विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन करत नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचं अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियर ने राहुलला (१२) तर कगिसो रबाडाने एडन मार्करामला (१५) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणाऱ्या पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे रबाडाचा बळी ठरला. पुजाराने ७ चौकारांसह ४३ तर रहाणेने ९ धावा केल्या. चहापानापर्यंत भारताने ५४ षटकात ४ बाद १४१ धावा केल्या. चहापानानंतर भारताने पंतच्या रुपात आपला पाचला फलंदाज गमावला. जानसेनने त्याला बाद केले. दरम्यान विराटने संयमी अर्धशतक फलकावर लावले. १६७ धावांत भारताने ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. विराटने आक्रमक पवित्रा धारण करत झटपट धावा जोत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. तो आज शतकाचा दुष्काळ संपवणार असे वाटत असताना बाद झाला. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर विराटला रबाडाने तंबूत धाडले. विराटने २०१ चेंडूंचा सामना करत १२ चौकार आणि एक षटकारासह ७९ धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर आफ्रिकेने भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणला. पहिल्या डावात भारताने ७७.३ षटकात सर्वबाद २२३ धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडाने ४, जानसेनने ३ बळी घेतले. लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हियर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
भारत – केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव
दक्षिण आफ्रिका – डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.