India Vs South Africa Test Match latest updates : दक्षिण अफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ विराट कोहलीशिवाय मैदानात उतरला आहे. कोहलीच्या मान आणि पाठीच्या दुखण्यामुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळणार नाहीये. त्यामुळे भारतीय संघ के. एल. राहुलच्या नेतृत्वात खेळणार आहे. या सामन्यात कर्णधार के. एल. राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
सलामी फलंदाजीसाठी कर्णधार के. एल. राहुल आणि मयांक अगरवाल उतरले. दोघांनीही संयमी खेळी करत १० षटकांमध्ये ३२ धावा केल्या आहेत. यात मयांकने २८ चेंडूत २२ आणि राहुलने ३६ चेंडूत ९ धावा केल्या.
भारतीय कसोटी संघ
के. एल. राहुल (कर्णधार), मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्वीन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उप कर्णधार), मोहम्मद सिराज
भारताचे ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचे लक्ष्य
दरम्यान, सरत्या वर्षांला धडाकेबाज कसोटी विजयासह निरोप दिल्यानंतर नव्या वर्षांत ऐतिहासिक शिखर सर करण्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सोमवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात यश संपादन करून आफ्रिकन भूमीत प्रथमच कसोटी मालिका विजय साकारण्याची ऐतिहासिक संधी भारताला साद घालत आहे.
सेंच्युरिअन येथे झालेल्या ‘बॉिक्सग डे’ कसोटीत भारताने पावसामुळे एक दिवस वाया जाऊनही ११३ धावांनी दणदणीत विजय मिळवून तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. १९९२ पासून भारतीय संघ आफ्रिका दौऱ्यावर जात आहे; परंतु त्यांना एकदाही तेथे कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ कमकुवत आफ्रिकेविरुद्ध ही संधी गमावणार नाही याची खात्री आहे.
कोहली स्वत:ही नव्या वर्षांत नेतृत्व आणि फलंदाजीत अधिक चमक दाखवण्याची अपेक्षा करत असेल. वाँडर्स येथील कसोटी भारताने जिंकली, तर सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत कोहली संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी येईल. त्याशिवाय वाँडर्सवर सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज ठरण्यासाठी कोहलीला अवघ्या सात धावांची आवश्यकता आहे. २०१८ मध्ये वाँडर्सवरच भारताने वेगवान माऱ्याच्या बळावर आफ्रिकेविरुद्ध तिसरी कसोटी जिंकून सर्वोत्तम संघ बनण्याच्या दिशेने वाटचाल केली होती.
हेही वाचा : “आम्ही विराटला म्हणालो, किमान भारतीय क्रिकेटसाठी तरी…”, निवड समिती अध्यक्ष चेतन शर्मांचा खुलासा!
राहुलवर फलंदाजीची भिस्त
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलवर भारताच्या फलंदाजीची प्रामुख्याने भिस्त आहे. पहिल्या सामन्यात राहुलने दमदार शतकी खेळी साकारली. सलामीवीर मयांक अगरवालही उत्तम लयीत असून अजिंक्य रहाणेला सूर गवसल्याचे दिसून आले. ऋषभ पंत यष्टिरक्षणासह उपयुक्त फटकेबाजी करण्यात पटाईत आहे.